चंबळ नदीत बोट उलटून 12 जणांना जलसमाधी, मृतांच्या कुटुंबियांना 1 लाखांची मदत जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात बुधवारी भीषण दुर्घटना घडली. चंबळ नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांना जलसमाधी मिळाली तर 4 जण अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि 20 जणांना वाचवण्यात यश आले.

हिंदी संकेतस्थळांची दिलेल्या वृत्तानुसार, आधीच जर्जर झालेल्या एका नावेत बसून 45 जण कमलेश्वर धाम मंदिरात दर्शनासाठी जात होते. क्षमतेहून अधिक लोक आणि 10 दुचाकींसह अन्य सामान नावेत ठेवल्याने संतुलन बिघडले आणि नाव उलटली. यामुळे नावेत बसलेले लोक नदीत पडले आणि बुडू लागले.

यातील दोन लोक पोहत बाहेर आले आणि त्यांनी दुर्घटनेची माहिती दिल्यावर कोटा येथून बचाव पथक रवाना झाले. पाणबुड्यांनी 19 जणांना वाचवले. यादरम्यान 12 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 6 पुरुष, 5 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच 4 जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, मृतांमधील अनेक जण गोठला कला आणि चाणड गावचे रहिवासी आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी उज्ज्वल राठोड, पोलीस अधीक्षक शरद चौधरी घटनास्थळी पोहोचले आणि बचवकार्याला तेजी आली. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि मंत्री शांती धारीवाल यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच मुख्यमंत्री गहलोत यांनी मृतांचा नातेवाईकांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.