तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे कोंबलेली पिशवी सापडली, नवी मुंबई एपीएमसीच्या नाल्यातील घटना

एका 30 वर्षीय तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी निघृणपणे हत्या करून मृतदेह एपीएमसी मार्केटमधील नाल्यात फेकला आहे. ओळख पटू नये यासाठी मारेकऱ्यांनी तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबून ती एपीएमसीच्या नाल्यात टाकली. या मृतदेहाला शिर आणि धड नाही. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेहाचे  शिर आणि धडाचा शोध घेण्यासाठी त्यांनी पथके रवाना केली आहेत.

एपीएमसी मार्केटमधून वाहणाऱ्या नाल्यात पडलेल्या निळ्या रंगाच्या बॅगमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती काही नागरिकांनी एपीएमसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही बॅग उघडली असता त्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाला शिर आणि धड नव्हते. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशी येथील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अज्ञात मारेकऱ्याने या तरुणाची हत्या केल्यानंतर ओळख पटू नये यासाठी मृतदेहाचे हात आणि पाय एपीएमसीत टाकले आहेत. मृतदेहाचे अन्य भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी या भागातील सर्व सीसीटीव्हींचे फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

प्रियंका गुरव हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा ताज्या

वरळी येथे राहणारी नववधू प्रियंका गुरव हिची तिचा पती, सासरा आणि सासू यांनी मे 2017 मध्ये हत्या केली होती. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मारेकऱ्यांनी तिच्या मृतदेहाचे धड नवी मुंबईच्या ऐरोली येथील नाल्यात टाकले होते. मृतदेहाचे अन्य भाग शिळफाटा आणि शहापूर परिसरात फेकले होते. ऐरोलीच्या नाल्यात सापडलेल्या धडावर आढळून आलेल्या टॅटूमुळे प्रियंकाची ओळख पटली आणि मारेकऱ्यांना अटक झाली. एपीएमसीत सापडलेल्या या मृतदेहामुळे प्रियंका गुरव हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या