
तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यानंतर अफगाणिस्तान आणखीनच अशांत बनले आहे. मंगळवारी राजधानी काबूलमधील लष्कर रुग्णालयाच्या परिसरात लागोपाठ दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी गोळीबारही केला. या हल्ल्यात 19 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने घडवला हे अद्याप उघड झालेले नाही.
400 बेडच्या सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या गेटसमोर पहिला स्फोट झाला, तर दुसरा स्फोटही याच रुग्णालयाच्या आवारात झाला. अफगाणिस्तान लष्कराच्या सर्वात मोठय़ा रुग्णालयाला हल्लेखोरांनी टार्गेट केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अद्याप कुठल्याच दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी यामागे इसिसचाच हात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, इसिसच्या काही शस्त्रधारी दहशतवाद्यांनी रुग्णालयात घुसून सुरक्षा दलाच्या जवानांशी झटापट केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी दहा मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट घडवून प्रचंड दहशत माजवली. एक स्फोट कारमध्ये झाल्याचे ‘अल जजीरा’च्या वृत्तात म्हटले आहे.
तालिबान्यांच्या आक्रमणानंतर हजारो लोकांनी अफगाणिस्तान सोडले. याचदरम्यान 26 ऑगस्टला काबूल विमानतळावर मोठी गर्दी झाली असतानाच सर्वात मोठा स्फोट झाला होता. त्यात 100 हून अधिक लोक ठार, तर जवळपास 150 लोक जखमी झाले होते.
तालिबान्यांच्या सत्ता काळात इसिसच्या कारवाया वाढल्या आहेत. मंगळवारच्या स्फोटालाही इसिस कारणीभूत असल्याचा संशय आहे. इसिसने 2017 मध्येही याच सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.






















































