
>> प्रज्ञा सदावर्ते
आशयसमृद्ध कवितेतून अलगद डोळ्यांसमोर उभे राहणारे तिचे चित्ररूप किंवा रंगा-ढंगापलीकडे आकर्षित करणाऱ्या चित्रातून सहज उलगडणारी कविता यांच्यात नाते असते का? खरं तर कवितेत दडलेल्या सृजन रेषा आणि चित्रातील सृजन बोली वेगळ्या नसतातच याची अगदी ठळकपणे जाणीव करून देणारा कवितासंग्रह आहे ‘अवघेचि उच्चार’. साहित्य, चित्रकला, नाटक, संगीत यात रमलेल्या, संवेदनशील मनाच्या नाशिक येथील प्रसिद्ध कवी, चित्रकार राजू देसले यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह. वरवर गूढ, पण सहज आशयाचे पदर उलगडत काही कवितांचा गाभा भेटतो, तर सहजसोप्या वाटणाऱ्या अनेक कविता आपले आशयविश्व मर्यादित नाही हे सांगून जातात. आत्मशोध घेत निघालेली कविता मानवी स्वभावाचे, वास्तवाचे भान देत चित्रभाषा, स्वरलिपीची ओळख घडवत खरी खणखणीत सृजन बोली शिकवून जाते.
आशयसंपन्नता, दृष्यात्मकता, भाषा-चित्र सौंदर्याचा ठेवा, चिंतनाचा प्रवास म्हणून हा काव्यसंग्रह रसिकांच्या कायम स्मरणात राहील. यात एकूण 72 कविता आहेत. भूतकाळ चिकटलेल्या माणसांबद्दल, महामाये, कळप, तिच्या जाण्याचं स्मरण, काळ, मोनालिसाच्या फसलेल्या हास्याची कविता, विठ्ठल, आई अशा काही मोजक्या कवितांचा अपवाद सोडला तर सगळ्याच कविता अल्पाक्षरी आहेत. त्या कमी शब्दांत आशयाचा मोठा पट उलगडणाऱया आहेत. साहित्य, नाट्य, चित्रकला अशा अनेक कला प्रकारांनी ज्या व्यक्तीचे आयुष्य समृद्ध केले, व्यापून टाकले आहे, ती व्यक्ती या कलागुणांना एकेका कप्प्यात बंदिस्त करू शकत नाही. एका कलेतून दुसरी कला जन्मावी पिंवा एकाच कलाकृतीत अनेक कलांचा संगम व्हावा आणि तेच सृजन रूप रसिकांना जास्त भावून जावं असा अनुभव राजू देसले यांचा ‘अवघेचि उच्चार’ देऊन जातो.
आतल्या धगीची चैतन्य सळसळ
मूर्त-अमूर्ताच्या दुखऱ्या कॅनव्हॉसवर
ही पहिलीच कविता चैतन्याचा, सृजनाचा प्रवास, पाठ न सोडणारा जीवघेणा संघर्षदेखील समोर मांडते अन् या प्रवासात उलगडत जाणारी मौनाची चित्रलिपी विचार करायला भाग पाडते. या संग्रहातील केवळ याच नाही तर अनेक कवितांमधील प्रतिमा, दृष्यात्मकता थक्क करतात. यामध्ये मूर्त-अमूर्त चित्रशैली डोकावते. चित्रकार अन्वर हुसेन यांनी या संग्रहासाठी मुखपृष्ठ आणि आतील रेखाटने केली आहेत. आत्मस्वर सापडलेल्या कवितांना साजेशी अशी ही चित्रे आहेत. संग्रहाला कवी प्रवीण बांदेकर यांची प्रस्तावना आहे.
यात आई शीर्षक असलेल्या तीन कविता असून सर्वार्थाने त्या काव्यसंग्रहाचा प्राण आहेत. आईचं मोठेपण शब्दांत बांधणं तसं अवघडच, पण या कवीने तिच्यातील ऊर्जा, वेदनांनाही हसतमुखानं आपलंसं करण्याचा स्वभाव, ते मायेचं आभाळ समर्पकपणे काव्यात उतरवलं आहे, ते असं-
तिनं वेदनांची चित्रलिपी
अवगत केलीय शतकांपासून
काळोखाला फुंकर मारली की,
चंद्रफूल उमलतं म्हणे
तिच्या आभाळभर काळजात
दुसऱ्या कवितेत त्यांनी आईला सोशीक झाड म्हटलंय-
आतड्याच्या ओढीनं
जगणं तरारून ठेवणारं
आई नावाचं सोशीक झाड
विश्व नावाच्या काळजाची
ओल जपत राहतं…
आणि एका कवितेत जगणं शिकवणारी आई भेटते-
आई, तुझ्या डोळ्यांतली
समुद्रनिळाई,
ऋतूंचा कनवाळू वारा
तुझ्या ओठांवर…
कुठल्या पापणीवर
काळोख तोलतेस तू…
यातील कवितांनी झाड, पक्षी, नक्षत्र, पानं, फुलं असा निसर्ग जवळ केला आहे. कॅन्व्हास, रंगसौंदर्य, चित्रभाषा, स्वरसंगीतातही त्या रंगल्या आहेत. या माध्यमातून मौनाची भाषा, सृजन प्रवास, भावभावनांचा घाट, संवेदनेचं गाणं, अस्वस्थ मनाची घुसमट असे अवघे जगणे यात उतरलेले आहे. उद्गार, शोध अनंत काळाचा, आवर्तन या कविता मनाचा तळ शोधणाऱ्या आहेत. ‘महानगर’ कवितेत वास्तवातली रूक्ष तरीदेखील जगण्याची धडपड दिसते. ‘मौनाचं’ झाड ही कविता अल्पाक्षरी तरी खूपशी बोलकी आहे. यात कवीमधील चित्रकार अधिक स्पष्टपणे आशयाशी आपली गाठभेट करून देतो. वेदनेपासून सुरू झालेला करुणेपर्यंतचा प्रवास ‘व्हायोलिन’ या कवितेतल्या स्वरलिपीतून भेटतो. ‘स्वतःच्या आत खोलवर शोधलं की घुसमट, मौन मागे पडून जगणं काय ते हाती लागतं’ हे ‘मौनाच्या लाटा’ शिकवून जातात. ‘कृषावतार’मध्ये वड आणि त्या ओघानेच बदललेला काळ सरसर नजरेसमोरून जातो. ‘तीन मुली’ कविताही भावणारी आहे, जगण्याचा एक वेगळा पैलू सांगणारी आहे-
जखमा कितीही खोलवर
रुतून बसल्या तरी
युद्धभूमीवरची रक्तवर्णी तालीम
शांततेसाठी नवी हाक देतच राहते
‘तालीम’ ही काव्यसंग्रहातील शेवटची कविता. विध्वंसाची प्रचंड धग सोसलेली भूमी शांततेचे बीज रुजवण्याचा ध्यास घेते. अशक्यप्राय परिस्थितीत केवळ रुजवत नाही, तर अगदी बहरण्याचं बळ देऊन जाते. संग्रह वाचून संपलेला असतो, पण त्यातील ती सृजन बोली, तो निनादणारा सृजन सागर मनाच्या पॅनव्हासवर अनेक प्रतिमा मांडूनच थांबतो.





























































