सेलेब्रिटी चॉइस – गोष्टी पुस्तकांच्या अन् माझ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्मिता तांबे

पुस्तकं हा माझ्या आवडीचा, सवयीचा भाग आहेत. सध्याच्या दैनंदिन व्यस्ततेमुळे फारसं वाचन होत नसलं तरी अनेक पुस्तकं अशी आहेत, जी कायम माझ्या सोबतच आहेत असं वाटतं. वाचन हे माझ्या आवडीचा, सवयीचा भाग होण्याचा प्रवास एका अपघाताने घडला. कॉलेजच्या पहिल्या वर्षात प्रवेश करतानाच माझा अपघात झाला आणि पुढची दोन वर्षे माझ्या चालण्याफिरण्यावर बंदी आली. या काळात काय करायचं तर पुस्तकं वाचायची. यात पहिलं पुस्तक माझ्या हाती पडलं ते ‘ययाती’. वयाच्या अगदी योग्य टप्प्यावर हे पुस्तक माझ्या हाती पडल्याने ते वाचून पूर्ण केल्यावरच खाली ठेवलं. भालचंद्र नेमाडे, विश्वास पाटील, श्याम मनोहर, सिमॉन द बोवुआ हे माझे आवडते लेखक. श्याम मनोहरांची पुस्तकं अॅब्सर्ड म्हणता येतील अशा धाटणीची असतात. त्यांचं ‘खेकसत म्हणणे आय लव्ह यू’ हे पुस्तक मला फार आवडतं. श्याम मनोहरांची सगळी पुस्तकं वेगळी फिलॉसॉफी आपल्यासमोर मांडतात. आपण स्वत:ला कितीही नॉर्मल दाखवायचं म्हटलं तरी आपला मेंदू अगदी अॅब्सर्ड विचार करणारा असतो आणि खरं तर हेच वास्तव आहे, जे त्यांच्या लेखनातून आपल्याला जाणवते.

काही पुस्तकं वेगळी म्हणूनही आवडून जातात. असंच आवडलेलं पुस्तक म्हणजे डॅडीज लॉंग लेग्ज, मुरलीधर खैरनारांची रहस्यमय अशी शोध कादंबरी, अरूण गद्रे यांचं सायंटिफिक रिअॅलिझम दर्शविणारं ‘एक होता फेंगाडय़ा.’ प्रचंड आवडलेली ही पुस्तकं वाचण्याचा अनुभव वेगळा होता माझ्यासाठी. मला पुन: पुन्हा वाचावीशी वाटणारी पुस्तकं म्हणजे स्वामी, ययाती, राडा, वासुनाका. भाऊ पाध्येंची सर्वच पुस्तकं वाचायला आवडतात. नेमाडेंचं ‘हिंदू’ हेही असंच आवडीचं पुस्तक.

वेगवेगळी पुस्तकं वाचताना आपण काही पुस्तकांपाशी थबकतो आणि ती पुस्तकं तुमचा हात हातात घेऊन पुढे कायम तुमच्या सोबत राहतात. असंच माझी मला ओळख करून देणारं माझं अत्यंत आवडतं पुस्तक म्हणजे सिमॉन द बोवुआचं ‘द सेकंड सेक्स!’ पुस्तकाच्या नावापासूनच आपली ओळख होण्याचा प्रवास सुरू होतो. हे पुस्तक वाचलं की, अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात आणि त्या प्रश्नांची उत्तरंही हे पुस्तकच आपल्याला देतं. एक स्त्राr म्हणून काय आहोत, कोण आहोत, आपल्या क्षमता काय आहेत याची जाणीव हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच होते. स्त्रियांनी पुरुषांबरोबर युद्ध करून काही जिंकण्याची आवश्यकता नाही. तिच्यातच इतकं सामर्थ्य आहे की, त्याची तुलना होऊ शकत नाही हे समजतं.

पुस्तकं हा माझ्या जिव्हाळ्याचा भाग आहेत. मी खरेदी केलेल्या, मला गिफ्ट मिळालेल्या पुस्तकांची वेगळी गोष्ट आहे. एखादं पुस्तक हातात घेतलं की, पुस्तकासोबत तोही प्रवास आपोआपच घडतो. पुस्तकांच्या आणि माझ्या अशा अनेक गोष्टी आहेत असं मी म्हणेन. त्यामुळेच मी वाचलेलं प्रत्येक पुस्तक मला माझं वाटतं.

शब्दांकन – शुभांगी बागडे