मुंबईत बांधकाम क्षेत्राला उभारी; घरकुलाच्या विक्रीत उत्साहवर्धक वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

कोरोना महामारी आणि आर्थिक मंदीच्या वातावरणामुळे गेले काही महिने संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्रासाठी मुंबई महानगरात उत्साहवर्धक अशी बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क (स्टॅम्प डय़ुटी) कमी केल्यावर दसरा आणि दिवाळीच्या काळात मुंबई महानगरातील घरकुल खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 42 टक्के वाढ झाली आहे.

यंदाच्या ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईत 7,929 घरे विकली गेली आहेत. गेल्या 8 महिन्यांतील गृहविक्रीची ही विक्रमी उसळी आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये मुद्रांक शुल्कात केलेली कपात हे असल्याचे सांगितले जात आहे. नाईट फ्रॅंक इंडिया या संस्थेने केलेल्या मुंबई महानगरातील घरकुल विक्री अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

नाईट फ्रँकच्या अहवालानुसार महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्कात लक्षणीय कपात केल्यांनतर मुंबई महानगरात नागरिकांनी यंदा नवरात्री आणि दसरा या सणांच्या निमित्ताने मोठय़ा संख्येने घरखरेदी केली आहे. या काळात म्हणजे ऑक्टोबर 2020 महिन्यात विक्रमी संख्येने 7,929 घरकुले विकली गेली आहेत.

गेल्या 8 महिन्यांतील ही मोठी घरविक्री असून त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना सणासुदीच्या काळात मोठी उभारी लाभली आहे. घरकुल विक्रीतील वाढ गेल्या महिन्यापेक्षा 42 टक्क्यांनी अधिक आहे. राज्याने स्टॅम्प डय़ुटी कमी केल्याने सरकारी तिजोरीतही ऑक्टोबर 2020 मध्ये 23280 लाख रुपयांची भर पडली आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये मुद्रांक शुल्काच्या रूपात राज्य सरकारला मुंबई महानगर क्षेत्रात घरकुल विक्रीमुळे 17640 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, असे नाईट फ्रँक इंडियाने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. घरकुल उभारणी क्षेत्राला उभारी देणारा मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय घेतल्याबद्दल नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी अहवालात महाराष्ट्र सरकारचे हार्दिक आभार मानले आहेत. या निर्णयामुळे घरबांधणी क्षेत्रातील उद्योजक आणि घर खरेदी करणारे ग्राहक दोघांचाही मोठा लाभ झाल्याचे बैजल यांनी सांगितले.