निखिलची गुरूंना सुवर्ण पदकाने श्रद्धांजली! महाराष्ट्राच्या अखेरच्या सोनेरी यशाला दुःखाची किनार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपला शिष्य निखिल दुबेच्या सुवर्ण पदकाचा साक्षीदार होण्यासाठी मुंबईहून अहमदाबादला दुचाकीवर निघालेले प्रशिक्षक धनंजय तिवारी यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. आपल्या गुरूंच्या आकस्मिक निधनाच्या एवढय़ा मोठय़ा धक्क्याने विचलित न होता महाराष्ट्राचा बॉक्सर निखिल दुबेने सुवर्ण पदक जिंकत आपल्या गुरूंना श्रद्धांजली वाहिली. 1994नंतर प्रथमच महाराष्ट्राला या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक मिळाले. मात्र स्पर्धेतील या अखेरच्या सोनरी यशाला दुःखाची किनार असल्याने निखिलला या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करता आला नाही.

गुरूंच्या पत्नीमुळे बळ मिळाले

गुरुवर्य धनंजय तिवारी यांच्या निधनामुळे निखिल दुबे मनाने खचला होता. मात्र तिवारी यांच्या पत्नींने पतीच्या निधनाचे दुःख थोडा वेळ बाजूला ठेवून थेट निखिलच्या सहकाऱयाशी फोनवर संपर्क साधला. निखिलचं सुवर्ण पदक बघण्यासाठीच तिवारी सर तिकडे येत होते ना. मात्र नियतीच्या मनात जे होते ते आपण मान्य करायला हवे. आता तुझ्या गुरूंसाठी तरी तू पदक जिंकायला हवेस. या एका वाक्याने निखिलला हत्तीचं बळ मिळालं. त्याने पुढील दोन्ही लढती जिंकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

गुरूंच्या निधनानंतरही तो लढला अन् जिंकला

महात्मा मंदिर सांस्कृतिक भवनात झालेल्या या स्पर्धेत 75 किलो वजनी गटात निखिल दुबेने सुवर्ण पदकाच्या लढतीत मिझोरामच्या मलसाव मितलुंगाचा 5-0 गुण फरकाने धुव्वा उडविला. निखिल हा मुंबई येथील ज्येष्ठ प्रशिक्षक धनंजय तिवारी यांचा शिष्य होय. निखिलने राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठल्याचे कळल्यानंतर त्याच्या उर्वरित दोन लढती ‘याचि देही याचि डोळा’ बघण्यासाठी तिवारी हे मुंबईहून अहमदाबादला येण्यासाठी मंगळवारी पहाटे दुचाकीवरून निघाले होते. मात्र वाटेतच त्यांचे अपघाती निधन झाले. उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच निखिलला हे अघटित वृत्त कळाले होते. अवसान गळालेल्या या मराठमोळ्या बॉक्सरने मनावर दगड ठेवून हे डोंगराएवढे दुःख लपवले अन् स्वतःला विचलित होऊ न देता उपांत्य आणि त्यापाठोपाठ अंतिम फेरी जिंकून ऐतिहासिक सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. सुवर्ण पदक जिंकूनच आपल्या गुरूंना श्रद्धांजली वाहण्याचे त्याचे ध्येय होते. त्या जिद्दीने तो दोन्ही लढती खेळला. निखिलच्या वडिलांचे कोरोना महामारीच्या काळात निधन झाले होते. निखिल याला मुष्टियुद्धासाठी घरच्यांचे नेहमी सहकार्य मिळाले आहे.