खेडमध्ये धबधब्या खाली पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। खेड

खेड तालुक्यातील रघूवीर घाटात धबधब्याखाली पडल्याने एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. प्राजक्त रविकिरण देवरुखकर असे त्याचे नाव असून तो बुधवार ११ जुलै रोजी धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत होता. पण पाय घसरल्याने तो उंचावरुन खाली पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, प्राजक्तच्या नातेवाईकांनी त्याचे नेत्रदान करुन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱया रघुवीर घाटातून पावसाळ्यात दिसणारे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. लोटे माळ येथील प्राजक्त देवरुखकर हा देखील बुधवार आपल्या मित्रांसह रघुवीर घाटात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी गेला होता. या ठिकाणी कातळी कडय़ावर चढून धबधब्यात भिजण्याचा तो आनंद घेत होता. पण पाण्यामुळे निसरड्या दगडावरून त्याचा पाय घसरला आणि तो उंचावरुन खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ खेड येथील रहिम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यानंतर त्याला चिपळूण येथील लाईफ केअर व तिथून लवेल येथील घरडा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यु झाला. प्राजक्त याच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.