
सामना प्रतिनिधी । पिंपरी
गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून लहान मुलाचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडीतील मुकाईनगर येथे घडली.
ज्ञानेश्वर बालाजी गायकवाड (वय १२) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी याबाबत माहिती दिली. ज्ञानेश्वरचे आई-वडील मूळचे नांदेडचे. हिंजवडीतील मुकाईनगर येथे ते वास्तव्यास असून, मोलमजुरी करतात. सोमवारी ते कामावर गेले असताना ज्ञानेश्वर त्याच्या लहान भावासह खेळत होता. खेळताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खड्ड्यात पडला. त्यावेळी तेथे कोणीच नसल्याने ही बाब लगेच लक्षात आली नाही. अर्ध्या तासानंतर त्याच्या लहान भावाने सांगितल्यावर ज्ञानेश्वर खड्ड्यातील पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शेजारील नागरिकांनी त्याला पाण्याबाहेर काढले.































































