ओव्हरहेड वायरच्या स्पर्शाने मुलगा भाजला; 90 टक्के भाजल्याने मुलावर उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर येथील उभ्या असलेल्या लोकलच्या छतावर चढलेल्या मुलाला ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाल्याने तो भाजला गेल्याची घटना रविवारी घडली. कुशल भेदा असे त्याचे नाव आहे. तो 90 टक्के भाजला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुशल हा मालाड मालवणीच्या गेट नंबर 5 येथे राहतो. तो रविवारी सकाळी गोरेगाव येथे क्रिकेट खेळण्याकरता गेला होता.

क्रिकेट खेळून झाल्यानंतर तो राम मंदिर येथील रेल्वे यार्डातील उभ्या असलेल्या लोकलवर चढला. ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाल्यामुळे तो भाजला गेला. या घटनेची माहिती कळताच बोरिवली रेल्वे पोलीस तेथे गेले. कुशलला पोलिसांनी उपचाराकरता गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले होते. तेथे काही वेळ उपचार केल्यावर कुशलला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.