
तुम्ही लहान मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुलाने मोबाईलवर तासभर ऑनलाईन गेम खेळल्यामुळे ब्रिटनमधील एका व्यक्तीला आपली गाडी विकून तब्बल 1800 डॉलरचे बिल भरावे लागले आहे.
राईज ऑफ बर्क हा गेम खेळताना 7 वर्षांच्या आशाज मुतासाने बरेच महागडे टॉप अॅप विकत घेतले. जेव्हा आशाजचे 41 वर्षीय वडील मोहम्मद यांना हा सर्व प्रकार कळला तेव्हा खूप उशीर झाला होता. या टॉप अॅपची किंमत 2.70 डॉलरपासून 138 डॉलरपर्यंत आहे. मोहम्मद यांना लागोपाठ 29 ई-मेल आले. सुरुवातीला त्यांना ऑनलाईन फसवणुकीचे आपण शिकार झालो आहोत असे वाटले. पण काही वेळाने त्यांना आपल्या मुलाचा पराक्रम समजला.
आयटय़ून्सचे बिल भरण्यासाठी मोहम्मद यांना त्यांची टोयोटा आयगो कार विकावी लागली. ‘मुलांच्या गेम खेळण्यावर इतका पैसा खर्च होऊ शकेल असे मला कधी वाटले नव्हते’ असे मोहम्मद म्हणाले. या घटनेनंतर त्याने अॅपलकडे तक्रार केल्यानंतर त्याला 287 डॉलर रिफंड म्हणून देण्यात आले. पण उर्वरित बिल भरण्यासाठी मोहम्मद यांना गाडी विकावी लागली. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये एका मुलीने मोबाईलमध्ये खेळता खेळता फूड डिलिव्हरी अॅपवरून 100 नुडल्स बाऊलची ऑर्डर दिली होती.






























































