
सामना ऑनलाईन, मुंबई
काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे निश्चित केले आहे. आजच ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना चालवण्याची नामुष्की
सामना ऑनलाईन,मुंबई राज्यात विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच प्रदीर्घ कालावधीसाठी विरोधी पक्षनेतेपद रिक्त असून येत्या 17 जूनपासून सुरू होणारे विधिमंडळ अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना चालवण्याची नामुष्की विरोधकांवर आली आहे. राज्यातील विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वावर सोपवण्याचा ठराव प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला पण लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अजून सावरलेली नसल्याने विरोधी पक्षनेत्याची निवड अजून होऊ शकलेली नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे पद रिक्तच आहे. या रिक्त पदावर विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी मागील आठवडय़ात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेता निवडीचे सगळे अधिकारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.






























































