अशांत पाकिस्तान गृहयुद्धाच्या दिशेने…

flag_of_pakistan

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

50 टक्के पाकिस्तानी सैन्य आज पाकिस्तानचा अंतर्गत हिंसाचार थांबविण्यात गुंतलेले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष हिंदुस्थानात दहशतवाद वाढवण्यापासून कमी होत आहे. त्यांना दहशतवादाकरिता पुरेसे युवक मिळत नाहीत. येणाऱया काळामध्ये चीनला मदत करण्याकरिता लढाई सुरू करण्याची पाकिस्तानी सैन्याची क्षमता नाही. अर्थातच हिंदुस्थानकरिता या घटना चांगल्या आहेत. राजकीय पक्षांच्या आंदोलनामुळे जर पाकिस्तानमध्ये सैन्याचे महत्त्व कमी झाले तर हिंदुस्थानात दहशतवाद वाढवण्याची क्षमता नक्कीच कमी होईल.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरकार असलेल्या सिंध प्रांतातील पाकिस्तान मुस्लीम लीगचे (नवाझ) नेते आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई कॅप्टन सफदर आवान यांना 19 ऑक्टोबरला नाटय़मयरीत्या अटक करण्यात आली. आवान यांच्या अटकेसाठी सिंध पोलिसांच्या इन्स्पेक्टर जनरलवर सैन्याने दबाव आणला. मात्र इन्स्पेक्टर जनरलने सैन्याचे ऐकले नाही, त्यांचे अपहरण करण्यात आले आणि जबरदस्तीने सफदर यांच्या अटकेच्या आदेशावर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली. 18 ऑक्टोबरला कराचीत ‘पीपीपी’ने आयोजित केलेल्या रॅलीच्या दिवशी सफदर यांनी आणि मरियम नवाझ यांच्यासह कराचीतील मोहम्मद अली जीना यांच्या थडग्याचा दौरा केला. इथे त्यांनी कथितरीत्या घोषणाबाजी केली. दुसऱया दिवशी त्यांना जीना यांच्या थडग्याचे पावित्र्य भंग केल्याच्या आणि काही व्यक्तींना हत्येची धमकी दिल्याच्या आरोपाखाली हॉटेलमधून अटक करण्यात आली होती.

पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी या घटनेचा विरोध करतानाच चिंताही व्यक्त केली. विरोधकांनी या घटनेचा निषेध केला. इम्रान खान सरकारला मिळणाऱया सैन्य समर्थनाच्या विरोधात विरोधी पक्षांतील एकतेसाठी ‘पीडीएम’ अस्तित्वात आली. ‘पीडीएम’ पाकिस्तानातील राजकीय पक्षांची आघाडी असून त्याची स्थापना सप्टेंबरमध्ये केली गेली. इम्रान खान सरकार उलथून टाकण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी मौलाना फजलुर रहमान ऊर्फ ‘मौलाना डिझेल’ याची मदत घेण्याचे ठरविले आहे. ‘अपयशी राष्ट्र’ अशी ओळख असलेल्या पाकिस्तानच्या राजकारणात मुल्लामौलवींचे स्थान अतिशय बळकट आहे. कोणताही पक्ष सत्तेत असला तरीही त्याच्यावर मुल्ला वर्चस्व ठेवतात.

पोलिसांत असंतोष
शांतता काळात पाकिस्तानच्या सीमा सुरक्षेची जबाबदारी ‘पाकिस्तान रेंजर्स’ या निमलष्करी बलावर आहे. ते पाकिस्तानी लष्कराचे महत्त्वाचे अंग आहे. यावेळी लष्करालादेखील पोलिसांच्या जोरदार विरोधाचा सामना करावा लागला. कॅप्टन सफदर यांच्या अटकेनंतर पोलिसांशी केलेल्या गैरवर्तनामुळे सिंधचे आयजीपी मुस्ताक मेहर आणि दोन ऑडिशनल इन्स्पेक्टर जनरल तसेच सात पोलीस सुपरिटेण्डेंटस् यांनी विरोधासाठी सुट्टीवर जाण्याचा अर्ज दिला. सिंध पोलिसांनी 18 व 19ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या घटनांनी राज्यातील पोलिसांचे मनोबल खच्ची केल्याचे म्हटले. या संपूर्ण घटनाक्रमामुळे पाकिस्तानची सत्ता नेमकी कोणाकडे आहे हे पुन्हा समोर आले. इम्रान खान पंतप्रधानपदी ‘‘नियुक्त झाले, निवडले नाहीत, ते पाकिस्तानी सैन्याचे प्यादे आहेत’’ हे विरोधकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानमधील सरकार, विरोधी पक्ष लष्कराविरोधात एका मर्यादेपर्यंतच जाऊ शकतात आणि ती मर्यादा लष्कराने ठरवली आहे. आताच्या घटनाक्रमानंतर सैन्य स्वतःहून पुढे आले व विरोधकांच्या नाडय़ा आवळत आहे. ‘पीपीपी’ सरकारने स्वतःला या संपूर्ण घटनाक्रमापासून अलग केले आहे. दुसरीकडे मरियम नवाझ यांनी ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’ची बाजू मांडताना या घटनेचे खापर इम्रान खान यांच्या माथी फोडले, मात्र लष्कराविरोधात नाही. हा घटनाक्रम पाकिस्तानी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वातील ‘पीटीआय सरकार’ आणि सैन्य या खेळाला सर्वांसमोर आणले. पाकिस्तानचे शासन मंत्रालय नव्हे, तर रावळपिंडीतील जनरल हेडक्वॉर्टर्समधून चालवले जात आहे आणि या सर्व कारणांमुळे इथे नागरी सरकारच्या तंत्रप्रणालीतील महत्त्वाच्या संस्था अतिशय पद्धतीने प्रभावित होत आहेत.

हिंदुस्थानवर परिणाम
आजवर पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन या अल्पसंख्याकांवर अन्याय होतच होते; आता शिया मुसलमानही पाकिस्तानात सुरक्षित नाहीत. शिया मुसलमानांच्या कत्तलीसाठी सिपाह-ए-सहाबा या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या नेतृत्वात मोठय़ा संख्येने सुन्नी कराचीच्या रस्त्यावर उतरलेले आहेत. शिया समुदायाचे इमामवाडे व मशिदी आता या सुन्नी मुसलमानांच्या निशाण्यावर आहेत.

गिलगीट-बाल्टिस्तानच्या मूळनिवासी असलेल्या समुदायावरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाकिस्तानी सैन्यसमर्थित दहशतवाद्यांनी शेकडोंच्या संख्येने मूलनिवासींच्या हत्या केलेल्या आहेत. पाकिस्तानचे सैन्य बलुचिस्तानमधील जनतेवर अनेक वर्षांपासून अत्याचार करीत आहे. राजकीय नेते, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार यांच्यासह हजारो लोक बलुचिस्तानमधून गायब होत आहेत. सुरक्षा बलाने जवळजवळ 50 हजारांहून अधिक लोकांना गायब केलेले आहे.

पाकिस्तानातील घटनांचे हिंदुस्थानवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. मानवतेच्या दृष्टीने कुठल्याही हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकत नाही. शियाविरुद्ध हिंसाचाराला जागतिक राजकारणातील सुन्नी-शिया संघर्षाचे संदर्भ आहेत. गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानचे शिया इराण आणि सुन्नी आखाती अरब देशांशी संबंध अधिक मजबूत झाले असल्याने कोणतेही धोरण पूर्ण विचारांती अंगीकारायला हवे.

50 टक्के पाकिस्तानी सैन्य आज पाकिस्तानचा अंतर्गत हिंसाचार थांबविण्यात गुंतलेले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष हिंदुस्थानात दहशतवाद वाढवण्यापासून कमी होत आहे. त्यांना दहशतवादाकरिता पुरेसे युवक मिळत नाहीत. येणाऱया काळामध्ये चीनला मदत करण्याकरिता लढाई सुरू करण्याची पाकिस्तानी सैन्याची क्षमता नाही. अर्थातच हिंदुस्थानकरिता या घटना चांगल्या आहेत. राजकीय पक्षांच्या आंदोलनामुळे जर पाकिस्तानमध्ये सैन्याचे महत्त्व कमी झाले तर हिंदुस्थानात दहशतवाद वाढवण्याची क्षमता नक्कीच कमी होईल.

पुढच्या काही महिन्यांमध्ये अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर तिथल्या राज्यकर्त्या तालिबानवर पाकिस्तानचा पूर्ण कंट्रोल असेल. त्या वेळेला पाकिस्तान अफगाणिस्तानच्या तालिबान्यांचा कश्मीरमध्ये नक्कीच दहशतवाद वाढवण्याकरिता उपयोग करेल. पाकिस्तानमध्ये कितीही कठीण परिस्थिती आली तरी पाकिस्तानी सैन्य आपले हिंदुस्थानात दहशतवाद वाढवण्याचे काम थांबवणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या