पंतप्रधानांपासून राजपरिवारापर्यंत चीनने ब्रिटनच्या 40 हजार लोकांची हेरगरी केल्याचा दावा

960

चीनच्या कारवाया आणि कुरघोडींमुळे हिंदुस्थानच नाही तर अनेक देश त्रस्त आहेत. चीनने हिंदुस्थानातील 10 हजार लोकांची हेरगिरी केल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने सोमवारी केला होता. या दाव्यानंतर ब्रिटनमधूनही असाच दावा करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये एका चिनी कंपनीने सुमारे 40 हजार लोकांची माहिती जमवली असून त्यांची हेरगरी केल्याचा दावा ‘द टेलिग्राफ’ ने केला आहे. चीनच्या कंपनीने 40 हजार लोकांची माहिती जमवली आहे. त्याचा वापर चीनचे सरकार हेरगिरीसाठी करत असल्याचे वृत्तपत्रात म्हटले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन, ब्रिटनचे राजघराणे, राजकीय नेते, व्यापारी, अभिनेते यांची माहिती चीनच्या कंपनीने जमवली आहे. चीनच्या सर्व्हरमध्ये एक फोल्डर तयार करून त्यात ही माहिती ठेवण्यात आली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांसह त्यांचे मंत्रीमंडळ, सैन्यातील अधिकारी तसेच काही गुन्हेगारांचीही माहिती जमवण्यात आली आहे. मात्र, चीनने ही माहिती कशी जमवली आणि हे काम कधीपासून सुरू आहे, चीनकडून अशा हेरगिरीला कधीपासून सुरुवात झाली याची माहिती मिळालेली नाही. या वृत्तानंतर ब्रिटनच्या संसदेत याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या माहितीवरून संपूर्ण ब्रिटनच चीनच्या दृष्टीक्षेपात असल्याचे दिसून येत आहे, असे मत अनेक खासदारांनी व्यक्त केले. तसेच याबाबत चिंता व्यक्त केली.

चीनने हिंदुस्थानातही हेरगिरी केल्याचा दावा इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. चीनच्या एका कंपनीने पंतप्रधान, राष्ट्रपती, कॅबिनेट मंत्री, काही मुख्यमंत्री, माजी लष्करप्रमुख, सैन्य दलातील अधिकारी, न्यायाधीश, अभिनेते आणि खेळाडूंची माहिती जमवत हेरगिरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. चिनी कंपनीने जमवलेली ही माहिती चीनच्या लष्कराला (पीएलए) देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. चिनी कंपन्या माहिती चोरत असल्याचा संशय असल्याने सरकारने चीनच्या अनेक मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. ‘द टेलिग्राफ’ मधून चीनकडून होणारी माहितीची चोरी आणि हेरगरीबाबतची मोठी माहिती उघड झाली आहे. हिंदुस्थान, ब्रिटनप्रमाणे चीनने इतर देशांचीही हेरगिरी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या