
ब्रिटनमध्ये राजकीय उलथापालथ झाली असून, 50 मंत्री, खासदारांनी बंडखोरी करत राजीनामा दिल्यामुळे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी अखेर राजीनाम्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबरपर्यंत नवीन पंतप्रधानांची निवड होणार असून, हिंदुस्थानी वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, ब्रिटिशांवर हिंदुस्थानींचे राज्य येण्याची दाट शक्यता आहे.
पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या लहरी आणि वादग्रस्त कार्यशैलीवर सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षात (हुजूर पक्ष) वर्षभरापासून प्रचंड नाराजी होती. ब्रिटनमधील जनतेतही जॉन्सन यांच्यावर रोष आहे. जॉन्सन यांच्याविरुद्ध मतभेद झाल्यामुळे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला आणि बंडाळी माजली. परराष्ट्रमंत्री जेरेमी हांट, संरक्षणमंत्री बेन वॉलेस, सुनक यांच्या जागी नियुक्त केलेले अर्थमंत्री नदीम जाहवी यांच्यासह 50 मंत्री आणि खासदारांनी राजीनामे दिले. राजीनाम्याचे सत्र सुरू झाल्यामुळे बोरीस जॉन्सन यांनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला आणि पंतप्रधान पद सोडण्याची घोषणा केली. ब्रिटनमधील घटनेनुसार कन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून ऑक्टोबरपर्यंत पंतप्रधानपदासाठी नेता निवडला जाईल. तोपर्यंत जॉन्सन प्रभारी म्हणून पंतप्रधान पदाचा कार्यभार पाहतील.
हिंदुस्थानी वंशाचे ऋषी सुनक यांचे आई-वडील सुरुवातीला केनियात गेले आणि त्यानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. ऋषी सुनक यांचा जन्म ब्रिटनचा आहे. अवघ्या 40 व्या वर्षी 2020 मध्ये सुनक ब्रिटनचे अर्थमंत्री बनले. कोरोना काळात ब्रिटनची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. पर्यटन आणि उद्योगक्षेत्राला त्यांनी मोठे पॅकेज दिले. हॉटेल उद्योगासाठी ‘इट आऊट टू हेल्प आऊट’ ही योजना खूप गाजली. युरोपियन युनियनमधून ब्रिटनने बाहेर पडावे या जॉन्सन यांच्या धोरणाला त्यांनी पाठिंबा दिला होता.
राजीनाम्यापूर्वी देशाला संबोधित करताना जॉन्सन म्हणाले, अत्यंत दुःखी अंतःकरणाने मी कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेतेपद सोडत आहे. जेव्हा खासदार त्यांचा नेता निवडतील तेव्हा मी पंतप्रधानपदाचाही राजीनामा देईन. नवा नेता निवडण्याची प्रक्रिया पुढील आठवडय़ात सुरू होईल. यानंतर जॉन्सन यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
जर जॉन्सन यांनी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला तर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून डॉमनिक रोब यांची नियुक्ती होऊ शकते. मात्र सर्वाधिकार पक्षाच्या संसदीय गटाकडेच आहेत.
जॉन्सन यांचे वादग्रस्त वर्तन
लहरी आणि वादग्रस्त व्यवहारामुळे जॉन्सन यांच्याविरुद्ध मंत्र्यांनी बंड पुकारले. प्रिन्स फिलिप यांचे निधन झाले तेव्हा दुखवटा होता. मात्र, प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी जॉन्सन यांनी दारू पार्टी केली होती.
कोरोना लॉकडाऊन असताना लोक घरात अडकून पडले. त्यावेळी जॉन्सन यांनी केलेल्या दारू पार्टीमुळे ब्रिटनमध्ये मोठा वाद झाला होता.
लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेले खासदार क्रिस पिंचर यांची डेप्युटी चीफ व्हिप म्हणून नियुक्ती केली. या निर्णयांमुळे बंड झाल्याचा अंदाज आहे.
सहा नावे चर्चेत
पंतप्रधान पदासाठी परराष्ट्रमंत्री जेरेमी हांट, अर्थमंत्री नदीम जाहवी, वाणिज्य व व्यापारमंत्री पेनी मॉर्डेट, संरक्षणमंत्री बेन वॉलेस, कॉमनवेल्थमंत्री विंज ट्रस आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे सहाजण शर्यतीत आहेत. ऋषी सुनक यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे. त्यांच्या नावाची घोषणा कन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून होऊ शकते. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी अक्षता या नारायण मूर्तींच्या कन्या आहेत.




























































