
सामना प्रतिनिधी । भिवंडी
अनधिकृत इमले बांधण्यासाठी भूखंड हडपणाऱ्या बिल्डरांनी भिवंडीत चक्क पोलीस चौकीच ढापल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या या कारनाम्याने पालिका प्रशासनही सामील झाले असून अधिकाऱ्यांना हाताशी धरून या बिल्डरांनी रातोरात पोलीस चौकी भुईसपाट केली. तसेच पाडकाम झाल्यानंतर दारे, खिडक्या, बिजागरासह दीड लाखांचा ढिगाराही उपसून नेला. या अजब प्रकारामुळे भिवंडीत एकच खळबळ उडाली असून निजामपूर पोलिसांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी नईम शेख, समशूजमा अन्सारी या दोघांना अटक केली आहे.
निजामपूर भागात सार्वजनिक बांधकाम किभागाच्या जागेवर बांधण्यात आलेली बौद्धवाडा पोलीस चौकी स्थानिक बिल्डरांनी पालिका कर्मचाऱ्यांशी संगनमत करून रातोरात उद्ध्वस्त केली. त्यासाठी पालिकेच्या जेसीबी व डंपरचा उपयोग केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निजामपूर पोलिसांनी बिल्डर मुद्दसीर बर्डी, फैजलअबूजी, मुनवर शेख व नईम शेख , समशूजमा अन्सारी, मुजाहिद अन्सारी यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. बौद्धवाडा पोलीस चौकी काही वर्षांपासून बंद असल्याने त्या जागेवर बिल्डर लॉबीचा डोळा होता.
मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार
बौद्धवाडा पोलीस चौकी निजामपूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. असे असताना स्वत:ची मालमत्ता तोडण्याची घटना पोलिसांना माहिती नसावी ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून दोषींवर कारवाईची मागणी करणार आहे. – शांताराम मोरे, शिवसेना आमदार, भिवंडी (ग्रामीण)





























































