भायखळा कारागृहात कैदी महिलांच्या मुलांचा जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आईची सोबत म्हणून भायखळा कारागृहाच्या चार पोलादी भिंतींच्या आत राहावे लागत असलेल्या लहानग्यांनी आज जल्लोष केला. असह्य उकाडा, एकच दिनक्रम यापासून विरंगुळा म्हणून भायखळा कारागृह प्रशासनातर्फे कैदी महिलांच्या मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांनी मनसोक्त आनंद लुटत विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला.

भायखळा महिला कारागृहात आईसोबत राहणाऱ्या मुलांसाठी कारागृह प्रशासनाने समर कॅम्पचे आयोजन केले होते. या मुलांसाठी पाण्याचे छोटे टब बनवून त्यात पाण्यातले खेळ घेण्यात आले. मुलांनी पाण्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. कारागृह अधीक्षक विकास रजनलवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद टेंगले, संदीप चव्हाण, संतोषी कोळेकर, तुरुंगाधिकारी अमृता दशवंत आदी उपस्थित होते.