त्रिमूर्तींची सल्लागार समिती बरखास्त, विश्वविजेत्या संघाचा कर्णधार निवडणार मुख्य प्रशिक्षक

188

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी अर्ज मागवण्याची घोषणा केली. हिंदुस्थानचा नवा मुख्य क्रिकेट प्रशिक्षक ठरवण्याची कामगिरी आता माजी कर्णधार कपिलदेवच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आहे. बीसीसीआय प्रशासकीय समितीने नेमलेल्या या समितीत माजी हिंदुस्थानी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी सलामीवीर अंशुमन गायकवाड यांचीही सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. नवी सल्लागार समिती निवडण्यात आल्याने बीसीसीआयने सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरभ गांगुली या त्रिमूर्तींची जुनी समिती बरखास्त केली आहे.

kapil-dev

बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 30 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची कालमर्यादा देण्यात आली आहे. या प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी बीसीसीआयने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे. ही समिती मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे.

विद्यमान प्रशिक्षकांना मिळणार 45 दिवस मुदतवाढ
सध्याच्या प्रशिक्षक वर्गाला 45 दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात आला आहे. यापैकी सर्व जण नव्याने त्यांच्या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. पण ते असले तरी हिंदुस्थानी संघाला नवे फिटनेस ट्रेनर आणि फिजिओ मिळणार आहेत. कारण सध्याच्या या 2 प्रशिक्षकांनी कार्यकाळ संपल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचे पद कायम राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या