कॅनडापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा धक्का; हिंदुस्थानी विद्यार्थी संख्या घटणार

कॅनडानंतर ऑस्ट्रेलियानेही हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. हिंदुस्थानातून ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या वाढत्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने तयारी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षातील विक्रमी स्थलांतरणामुळे ऑस्ट्रेलियात मालमत्तांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने 2025 पर्यंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या नोंदणीची संख्या 2 लाख 70 हजारपर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मर्यादेत उच्च शिक्षण अभ्यासक्रम, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.

1.22 लाख विद्यार्थी घेताहेत शिक्षण

गेल्या वर्षी हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन शिक्षणमंत्र्यांनी हिंदुस्थानी विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रेलियन उच्च शिक्षण संस्थांमध्ये देशांतर्गत प्रवेशाचा विस्तार करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, देशातील सुमारे 1.22 लाख विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये शिकतात. ऑस्ट्रेलियात कॅनडा, यूएस आणि यूके नंतर सगळ्यात अधिक विद्यार्थी हिंदुस्थानातील आहेत.