
“तुम्ही शेंडी ठेवता का… जानवे घालता का… मांसाहार करता का… कट्टर हिंदू आहात का…” हे प्रश्न आहेत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी मंगळवारी झालेल्या मुलाखतींमधील. असे अनेक प्रश्न सीईओ पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना विचारण्यात आले.
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून ट्रस्टच्या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे मंदिराचा कारभार पाहण्यासाठी आता पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल ५,२०० अर्ज आले होते; त्यातून १८ जणांची निवड करण्यात आली. या उमेदवारांची आधी ऑनलाइन मुलाखत घेण्यात आली, ज्यासाठी एक ‘गूगल फॉर्म’ देण्यात आला होता. यात उमेदवारांना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, नेतृत्वक्षमता आणि सामाजिक-धार्मिक सहभागाविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यातून ८ जणांची अंतिम निवड करण्यात आली असून अयोध्येत आज त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या.





























































