कराडजवळ मोटारीची ट्रकला पाठीमागून धडक, पोलीस कर्मचारी भावासह बहीण भाच्याचा मृत्यू

भरधाव मोटारीने रस्त्याकडेला थांबलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघातात पोलीस कर्मचारी भावासह बहीण आणि भाच्याचा जागीच मृत्यू झाला. मृत सर्वजण कोल्हापूर जिह्यातील आहेत. पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे आज हा अपघात झाला.

नितीन बापूसाहेब पोवार (रा. कोल्हापूर राजवाडा), मनीषा आप्पासाहेब जाधव आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. मृत नितीन पोवार हे कोल्हापुरातील पोलीस कर्मचारी आहेत.

अपघाताबाबत कराड पोलिसांनी माहिती दिली. पोलीस कर्मचारी असलेले नितीन पोवार हे वॅगनर मोटारीतून बहीण मनीषा आणि भाचा अभिषेक यांना पुण्याला सोडण्यासाठी जात होते. कराडजवळ पाचवड फाटा येथील भाग्यलक्ष्मी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला वॅगनर मोटारीने पाठीमागून धडक दिली. या धडकेत मोटारीचा चक्काचूर झाला असून, गाडीतील तिघे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस निरीक्षक विजय पाटील, उपनिरीक्षक जयकुमार उथळे यांनी वाहतूक सुरळीत केली.