आ. वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार कुडाळ तालुक्यातील सर्व्हिस रोडवर करण्यात आले कार्पेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कुडाळ तालुक्यातील पावशी, वेताळबांबर्डे येथे दुरवस्था झालेल्या सर्व्हिस रस्त्यावर कार्पेट करण्यात आले आहे. शिवसेना आ. वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार ठेकेदाराने तात्काळ हे काम केले आहे. याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले जात आहेत. पावशी सीमावाडी साईमंदिर, वेताळबांबर्डे सीमेवर व पावशी ग्रामपंचायती समोर सर्व्हिस रोडवर कार्पेट करण्यात आले आहे. अन्य ठिकाणीही कार्पेटचे काम सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पणदूर ते कुडाळ काळपनाका दरम्यान सर्व्हिस रस्त्यांसह महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी पाटील यांनी या मार्गावर कार्पेट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल शुक्रवारी आ. वैभव नाईक यांनी महामार्ग अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधीं समवेत कुडाळ येथे महामार्गाची पाहणी केली होती. सर्व्हिस रोडच्या झालेल्या दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. तसेच तात्काळ सर्व्हिस रोडची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनंतर काल सायंकाळ पासून सर्व्हिस रोडवर खडी पसरविण्यास सुरवात केली व रात्रौ ठिकठिकाणी कार्पेट करण्यात आले आहे. तालुक्यात कार्पेटचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.