चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात  वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा बळी गेला आहे. भेंडाळा येथील शेतशिवारात तीळ कापणीचे काम करीत असलेल्या अंगणवाडी सेविकेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात प्रेमिला महाडोरे (56) यांचा मृत्यू झाला. पळसगाव (जाट) येथील शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रेमिला महाडोरे या भेंडाळा येथील अंगणवाडीत सेविका म्हणून कार्यरत होत्या. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने त्या पती पुंडलिक महाडोरे (60) यांच्यासोबत स्वतःच्या शेतात तीळ कापणीसाठी गेल्या होत्या. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोघेही शेतात काम करीत होते. दरम्यान, पती विहिरीवरील पाण्याच्या मोटारीकडे गेले असताना प्रेमिला काही अंतरावरील दुसऱया बांधीत तीळ कापत होत्या. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.