सांगोल्यात सासरच्या छळाला कंटाळून जावायची आत्महत्या; पाच जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यायालयातील पोटगीचा दावा काढून घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करून त्रास देणाऱ्या पत्नी, सासू-सासरे, मेहुणा व मामाच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाझरे येथे सोमवारी घडली आहे. याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी ‘माझ्या मृत्यूस पत्नीसह तिचे नातेवाईकच जबाबदार आहेत’, असे मेसेज व्हॉट्सऍपद्वारे घरातील नातेवाईकांसह मित्रांना पाठवून गळफास घेतला.

स्वप्निल उत्तम शिरदाळे (वय 36) असे मृताचे नाव आहे. पत्नी पूजा स्वप्निल शिरदाळे, सासू कस्तुराबाई मल्लिकार्जुन बुरकुल, सासरे मल्लिकार्जुन तुकाराम बुरकुल, मेव्हणा तुकाराम मल्लिकार्जुन बुरकुल (सर्व रा. आंधळगाव) व मामा चंदू पाटील (रा. धर्मगाव, ता. मंगळवेढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत प्रकाश उत्तम शिरदाळे याने तक्रार दिली आहे.

स्वप्निलची पत्नी पूजाने मंगळवेढा न्यायालयात स्वप्निलविरुद्ध पोटगीचा दावा दाखल केला आहे. हा दावा काढून घेण्यासाठी सप्टेंबर 2018 ते सोमवार 2 ऑक्टोबरपर्यंत आरोपींकडून वारंवार स्वप्निलला नातेवाईकांवर केस करण्याची धमकी देऊन व न्यायालयातील पोटगीचा दावा काढून घेण्यासाठी 10 लाख रुपये देण्याचा तगादा लावला होता. या सततच्या त्रासाला कंटाळून स्वप्निलने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. शेजारील शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आली असता, त्यांनी घरच्यांना याबाबत माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणाविरुध्द स्वप्निलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.