
बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी विकासक कमलेश शाह आणि त्याच्या मुलाविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
तक्रारदार मुकेश मेहता हे असून ते व्यावसायिक आहेत. ते गेल्या 40 वर्षांपासून कमलेश शहा यांच्यासोबत भागीदारीत विकासकाचे काम करतात. 2013 साली प्रेस्टिज प्रॉपर्टीअंतर्गत सिल्वर युरोनिया या नावाने चकाला येथे व्यावसायिक कॉम्प्लेक्स तयार केले होते. त्याचदरम्यान मेहता हे त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने ते त्यात व्यस्त होते. याच काळात शहा यांच्या मुलाने वैयक्तिक कामकाजासाठी ऑफिसमधील कागदपत्रे आणि फाईल्स या सिल्वर ग्रुप येथे नेल्याचा आरोप मेहता यांनी केला आहे. 2018 मध्ये मेहता यांनी एमसीएच्या वेबसाईटवर पाहिले असता कमलेश शहा आणि राज शहा हे भागीदारीत व्यवसाय करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
कमलेश शहा आणि त्यांच्या मुलाने एका फायनान्स कंपनीकडून प्रेस्टिज प्रॉपर्टीच्या नावावर मेहता यांच्या संमतीविना कर्ज घेतल्याचे मेहता यांचे म्हणणे आहे, तर 2017-18 मध्ये नव्याने 140 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे मेहता यांनी तक्रारीत म्हटले. शहा आणि त्यांच्या मुलाने शेअर होल्डर आणि मेहता यांना अंधारात ठेवून सिल्वर लँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एका फायनान्स कंपनीकडून खोटे कागदपत्रे तयार करून 45 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे मेहता यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच शहा यांनी एका खासगी बँकेत कंपनीच्या बँक खात्यातूनदेखील 14.50 कोटी रुपये स्वतःच्या बँक खात्यात घेऊन फसवणूक केल्याचा मेहता यांचा आरोप आहे. 2014-2018 या काळात शहा याने मेहता आणि त्यांच्या मुलीच्या परवानगीशिवाय सिल्वर ग्रुप कंपनीचे खोटे कागदपत्रे सादर करून स्वतः संचालक बनून फसवणूक केल्याचा मेहता यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कमलेश शहा यांच्याशी वारंवार संपर्क केला. त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही.


























































