खासगी लसीकरणाचे रॅकेट, बनावट लसीकरणप्रकरणी आणखी गुन्हा दाखल

बोरिवली येथील एका महाविद्यालयात बनावट लसीकरण केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी राजेश पांडे, संजय गुप्ता, महेंद्र सिंगसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बनावट लसीकरणप्रकरणी हा मुंबईतील चौथा गुन्हा दाखल आहे. तर लसीकरण घोटाळ्यात कांदिवली पोलिसांनी आणखी एका महिलेला अटक केली आहे.

बोरिवली पश्चिम येथील आर्किटेक्चर महाविद्यालयातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 3 जूनला लसीकरण कॅम्प आयोजित केला होता. त्यात 213 जणांना लस देण्यात आली होती. लस दिल्यानंतर काहींना लस घेण्याचे प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. तर काहींना लस घेतल्यावर त्रासही झाला नव्हता. लसीच्या नावाखाली इतर द्रवपदार्थ देऊन फसवणूक केल्याचे महाविद्यालयाच्या लक्षात आल्यानंतर याबाबत सोशल मीडियावर अनेक ट्विट होऊ लागले. त्याची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱयांनी चौकशी केल्यानंतर बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेऊन बोरिवली पोलिसांनी राजेश पांडे, संजय गुप्ता, महेंद्र सिंगसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुह्याच्या तपास आता बोरिवली पोलीस करणार आहेत.

डेटा एंट्री ऑपरेटरला अटक
कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील बनावट लसीकरणप्रकरणी गुडिया यादव हिला कांदिवली पोलिसांनी अटक केली. ती नेस्कोमधील कोविड सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून काम करत होती. न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोगस लसीकरणाला बळी पडू नका; संशय आल्यास संपर्क करा
शहरात बोगस लसीकरणाचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. काही समाजपंटक संस्था अथवा हॉस्पिटलच्या नावाने जाणीवपूर्वक नागरिकांचे बोगस पद्धतीने लसीकरण करीत असून नागरिकांची नाहक फसवणूक करीत आहेत. अशा प्रकारे चार ठिकाणी घटना घडल्या असून आतापर्यंत कांदिवली, खार, वर्सोवा आणि बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे असून असे प्रकार होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी आता गंभीर दखल घेतली आहे. पोलीस आता संस्था व हॉस्पिटलच्या नावाने राबविल्या जाणाऱया लसीकरण कार्यक्रमांवर वॉच ठेवणार असून नागरिकांना काही संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या