
सावकारी करत खंडणी उकळल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी 11 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर कल्याण रजपूत, जिग्नेशा सागर रजपूत, प्रभावती कल्याण रजपूत, राणी मारणे, अमित काळे, भुड्या व त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 53 वर्षांच्या नागरिकाने तक्रार दाखल केली असून ही घटना 2018 ते 22 जुलै 2021 दरम्यान घडली आहे.
आरोपींनी 5 लाख 50 हजारांच्या बदल्यात 25 लाख रूपये वसूल केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच व्याज या रकमेत जमा करून 85 लाख एवढी मुद्दल झाल्याचे सांगून त्यापोटी आंबेगाव बुद्रुक येथील 1 हजार 720 स्क्वेअरफूट जागचे जबरदस्तीने रजिस्टर्ड कुलमुखत्यारपत्र, नोटराईज्ड करारनामा व प्रतिज्ञापत्र करून घेतली आहे. तक्रारदाराचा मित्र अमित उनेसा याच्याकडूनही 7 लाख एवढ्या रकमेच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात व्याज वसूल करण्यात आले आहे. तसेच त्याला ठार मारण्याच्या धमक्या देत शिवीगाळ करून त्यांच्या घरी हत्यारासह 7 ते 8 गुंडांना पाठवून मोठ्या प्रमाणावर व्याज उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.






























































