
सामना ऑनलाईन । मुंबई
सीबीएसई शाळांच्या इमारती व तेथील पायाभूत सुविधांचा व्यावसायिक स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांविरोधात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई बोर्ड) कडक पावले उचलली आहेत. सीबीएसई शाळांमध्ये कोचिंग क्लास आणि खासगी टय़ूशन चालविण्यास बोर्डाने बंदी घातली आहे. सीबीएसई बोर्डाशी संबंध नसलेल्या कोणत्याही परीक्षांच्या तयारीसाठी शाळांचा वापर करण्यात येऊ नये अशा सूचना बोर्डाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी जारी केल्या आहेत.
स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसने सीबीएसई शाळांमध्ये आपले दुकान थाटल्याच्या तक्रारी सीबीएसई बोर्डाकडे आल्या होत्या. सीबीएसई शाळांमध्ये हे क्लासेस अथवा टय़ूशन सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. तरी काही शाळा ‘सीबीएसई’ या नावाचा वापर करून विद्यार्थी-पालकांची दिशाभूल करीत आहेत. याची गंभीर दखल सीबीएसई बोर्डाने घेतली शाळांच्या जागेचा व्यावसायिक कारणासाठी वापर करणाऱ्या शाळाचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षकांना खासगी टय़ूशन घेता येणार नाही
शिक्षण हक्क कायद्यातील कलम 28 नुसार शिक्षकांना खासगी टय़ूशन घेता येणार नाही. तसेच कायद्यानुसार सीबीएसई बोर्डाच्या कोणत्याही वास्तूचा व्यावसायिक वापरासाठी वापर करता येणार नाही. सीबीएसईने ठरवून दिलेला अभ्यासक्रम शिकविण्यासाठी या शाळांचा वापर करण्यात यावा अशा सूचनाही त्रिपाठी यांनी जारी केल्या आहेत.



























































