अकरावी ऑनलाइन प्रवेश, 22 जुलैपासून कॉलेज पसंतीक्रम भरता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीएसई दहावीच्या निकालामुळे रखडलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या शुक्रवार, 22 जुलैपासून एसएससी, आयसीएसई, आयजीसीएसई आणि एनआयओएससह ज्या शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचा भाग 2 म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम भरता येणार आहेत. गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया मात्र सीबीएसईच्या निकालानंतरच सुरू होणार आहे. राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी ही माहिती दिली.

एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल 17 जून रोजी जाहीर झाला तेव्हापासून विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार या प्रतीक्षेत आहेत. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर न झाल्याने या प्रवेशाला ब्रेक लागला होता. शिक्षण विभागाने सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवली असून सीबीएसई वगळता इतर बोर्डांचे विद्यार्थी अर्जाचा भाग 1 देखील भरत आहेत. आता 22 जुलैपासून ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 1 पूर्ण भरला आहे अशा विद्यार्थ्यांना भाग 2 म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यासोबतच अल्पसंख्याक, इनहाऊस, व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेशासाठीदेखील ऑनलाइन अप्लाय करता येणार आहे.

अकरावी प्रवेशाची वेबसाईट – http://11thadmission.org.in

कोटा प्रवेशासाठी
अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अप्लाय करावा.
याद्वारे केवळ कॉलेज पसंती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू राहील.
कॉलेज पसंतीक्रम भरल्यानंतर अर्ज लॉक करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन प्रवेशासाठी
विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज निवडून त्यांचे पसंतीक्रम ऑनलाइन नोंदविता येईल.
किमान एक आणि कमाल 10 कॉलेजचे पसंतीक्रम नोंदवून अर्ज लॉक करणे आवश्यक आहे.
नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी, अर्ज भाग 1 भरणे सुरू राहणार आहे. अर्जाचा भाग 1 व्हेरिफाय केलेले विद्यार्थीच भाग 2 भरू शकतात.

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा भाग 1 व भाग 2 भरण्याची प्रक्रिया निकालानंतरच सुरू करता येणार आहे. त्यासाठी त्यांना सुमारे पाच दिवसांपर्यंतचा वेळ दिला जाईल. त्यानंतरच प्रत्यक्ष प्रवेशफेरीला सुरुवात होईल. गुणवत्ता याद्यांचे सविस्तर वेळापत्रक यादरम्यान जाहीर होईल.
– महेश पालकर, संचालक माध्यमिक शिक्षण

गुणवत्ता यादी सीबीएसईच्या निकालानंतर

अद्याप सीबीएसईचा निकाल जाहीर न झाल्याने अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज 1 भरलेल्या विद्यार्थ्यांना केवळ कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळापत्रक, गुणवत्ता याद्या, कॉलेज अलॉटमेंट याची सविस्तर माहिती सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच जाहीर होणार आहे. तसेच कोटा प्रवेशाची पुढील कार्यवाही सीबीएसईच्या निकालानंतरच होणार आहे.