षटकोनी कुटुंब

अदिती सारंगधर,adsarangdhar@gmail.com

नेहा, चिन्मय मांडलेकरांचं छोटय़ा छोटय़ा पिलांनी भरलेलं घर… झिबू, कोको, टँकमधील मासे… सगळे मांडलेकरांकडे मजेत नांदतायत….

फायनली… करू या आर्टिकल, भेटू या करत आज ठरवलं. ठरलं. दारावरची बेल वाजली तसा आतून भूभूचा आवाज आला… आणि जस्सा दरवाजा उघडला तशा अंगावर उडय़ा… उडय़ाच उडय़ा… इटुकली, पिटुकली, झुबकेदार केसांची, एवढिशी पिल्लं पण आतच येऊ देइनात. ‘आधी माझ्या तोंडातलं खेळणं घे आणि थ्रो कर. मगच आत ये’ अस्संच सांगत होती.

‘अगं। तिला घरात येऊ देत. मग खेळ’ म्हटल्यावर चिन्मयनं मला आत येऊ दिलं. सोफ्यावर बसले तर एक मांडीवर आणि एक अखंड अंगावर उडय़ा मारतेय, टॉय फेकायचं आणि ती ते आणून देणार असा खेळ… दुसरी मात्र दमून किंवा बोर होऊन बाजूच्या टेबलाखाली जाऊन बसली आणि आम्ही (मी, नेहा, चिन्मय) फायनली एकमेकांशी बोलायला लागतो.

‘माझ्या लहानपणापासून नेहमीच आमच्याकडे कुत्रा होताच. त्यामुळे मी मोठीच झाले पेटबरोबर. लग्न झाल्यावर घरी कुणीच नाही. मी ठरवून घरी राहायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चिन्मय शूटिंगला गेल्यावर मी एकटी. मग खूप कन्व्हिन्स केलं. कारण याला काही घरी पेट असणे या विषयात विशेष रस नव्हता.. पण माझ्या मुलांनीही पेटबरोबर मोठं व्हावं असं मला नेहमीच वाटायचं. हो-नाही करता करता मांजर आणायचं ठरलं. पर्शियन कॅट आणि फजू (फजूबॉल) घरी आला. आमचं पहिलं बेबी.

‘माझं बालपण चाळीत गेल्यानं घरी नाही पण चाळीचे असे कुत्रे होते. त्यांच्याशी खेळायचो. पण मांजर… आय यूज्ड टू हेट कॅटस्… फजू येईपर्यंत’ चिन्मय म्हणाला आणि त्याला कंपनी म्हणून अजून एक पर्शिअन कॅट आणलं. इरा (माझी मुलगी) तेव्हा 6 महिन्यांची असेल. फजू तिच्या बेडच्या बाजूला बस्सून राहायचा. कधी खेळता खेळता इराच्या टपलीत वगैरे मारायचा इतकं गोड बॉडिंग झाले होतं… आणि चेरीसुद्धा. पण फजूबॉलला न्यूटर केलं आणि खूप वजन वाढायला लागलं त्याचं. एक दिवस सकाळी मस्त बाय वगैरे करून गेलो आणि संध्याकाळी आलो तर फजूबॉल हलेचना. चेरी निर्विकार. त्याच्या बाजूला बसली होती. फजूबॉल गेला गं अचानक. चेरी डिप्रेशनमध्ये गेली. मग तिला तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये सोडलं. पुन्हा एकदा घर रिकामं. आता तर मुलांनाही जाणवायला लागलं. फक्त फिश होतं घरी. पण अगेन त्यांचं त्यांचं सुरू असतं आयुष्य. आपली डायरेक्ट इंटेरॅक्शन नसते ना.

आणि मग आमच्याकडे गोरी गोरी पान साशा आली. सायबेरीअन हस्की. जहांगीर (आमचा मुलगा), इरा आणि साशा… तीन-तीन मस्तीखोर मुलं होती घरात. साशा 9 महिने होती आमच्याकडे ती कम्प्लीट डॉग होती. नेहा म्हणाली, आई तिची मास्टर सकाळी ऍक्चुअली पहाटेच उठून 4 किलोमीटर चालायचं. संध्याकाळी चालायचं. मस्त हेल्थ फूड खायचं. कधीतरी ट्रीट्स वगैरे आणि सायबेरीअन हस्की असल्यानं जरा जास्तच रुबाबातच वावरायचं. मुलांचंही इतकं सुंदर बॉण्डिंग झालं तिच्याशी पण.

गणपतीच्या काळात तिला बाहेर कॅनलमध्ये 2 दिवस ठेवलं. तिथे तिचा एक ऍक्सिडेंट झाला. जो वेळीच आम्हाला कळवला नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या पिल्लांच्या पायात 3 फ्रॅक्चर्स झाली आणि 2 महिने हाऊस अरेस्ट. वॉक रन म्हणजे तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होता त्या साशाला धावण्याची मनाई. त्यामुळे ती खूप चिडचिडी झाली. तिचं फूड ऍग्रेशन खूप वाढलं. इतकं की जेवणाच्या ताटात बाजूनं येरझाऱया घालायची आणि कुणी क्रॉस झालं की सरळ  झडप… मुलांना, आम्हाला सगळ्यांना चावून झालं. तरीही आम्ही काऊन्सिलर्सला कन्सल्ट करून आमची रुटिन्स बदलली तिच्याप्रमाणे. एकदा तर मी दिवसभर बेडवर बसून. उतरली तरी अटॅक करायची आणि फायनली अक्षरशः मनावर दगड ठेवून तिला मित्रांच्या फार्मवर पाठवायचं ठरलं. तिथे गेल्यावर खूप मोठ्ठी जागा, मित्र मिळाल्यावर ती आता छान आहे. पण जेव्हा तिला द्यायचं ठरलं तेव्हाच ठरवलं की येताना कुणीतरी आणायचं. आणायचंच.

कारण मुलं साशाला घाबरायला लागली होती. पण प्राण्यांना, पेटस्ना न घाबरता स्वीकारायला एक नवीन मित्र हवाच ना… बीकॉज आय ऑलवेज वॉण्टेड माय चिल्ड्रेन टू ग्रो अप विथ पेट्स. सो साशाला सोडलं. कोको घेऊन चिन्मय घरी आला. आमची शित्झू. कोको इज आमचं कोकोनट. पण पुढचे काही दिवस कोकोशी कनेक्टच होत नव्हता. साशाशी रिप्लेसमेण्ट म्हणूनच वाटायचं. मोठय़ा डॉग्सची भीती आहे त्याला पर्याय म्हणून छोट ब्रीड असंच वाटायचं. पण हळूहळू कोकोने मुलांना खिशात घातलं आणि इतकं इतकं अंगाशी येऊन खेळून आम्हालापण… आणि ते ट्रेनर बिनर फंदात न पडता ठरवलं आपणच आपल्या आणि तिच्या सोयीनं तिला मोठ्ठं करायचं. दिवसा मुलं शाळेत गेल्यावर म्हणून झिबू आमची लासा क्विक आली आणि जहांगीर कोको झिबूचं इतकं इतकं बॉण्डिंग झालं की सकाळी आम्ही बेडरूममधून त्या जहांगीरला अक्षरशः खेचून हॉलमध्ये सोफ्यावर आणतात आणि तिघेही अक्षरशः एकमेकांच्या अंगावर चढून उडय़ा मारतात. कारण कोकोने झिबूला इतकं सुंदर अक्सेप्ट केलं की कोको ताईच्या पावलावर पाऊल ठेवून झिबू पण तितक्याच प्रेमाने, रिस्पॉन्सिबिलीटीने वागायला शिकलेय. पण कोको आहे जरा थंडच… झिबू ऍज अ गार्ड डॉग. रात्री 3 वाजता कुत्री भुंकायला लागली की बयोपण वरून भुंकत राहणार आणि ‘काय डोक्याला ताप आहे’ करत कोको आमच्या बेडरूमच्या दाराशी येऊन बसणार. खरं तर निशाचर आहेत दोघं. दिवसभर टांग वर करून झोपणार आणि रात्र झाली की इथून तिथे पळ, दरवाज्यावर आपट, सोफ्यावर उडय़ा मार, खेळणी तोंडात घेऊन धाव सगळं सुरू असतं. मग कधीतरी पहाटे पाणीबिणी पिऊन आमच्या राण्या सोफ्याभर झोपणार.

‘एवढय़ाशा असल्यानं आवळून खेळायला पण इतकी मज्जा येतेय’ मी म्हणत असताना वामकुक्षी झाली बयोची आणि चार्ज करत येऊन झपकन अंगावर उडी मारली खेळायला… बोलता बोलता परत आमचा खेळ सुरू… माझा प्रयत्न लांबवर खेळणं फेकायचा आणि कोकाचा ते लांब जाऊ न देण्याचा…

आंघोळ… बापरे हा एक मोठा कार्यक्रम असतो. त्यामुळे त्याचा वन्स अ मन्थ छान स्पा असतो. खाण्याचेही तसे नखरे नसल्यानं आणि केसांच्या काळजीमुळे चिकन राईस, चिकन सूप, कधी डॉग ट्रीट्स आणि सतत आमच्या फर्निचरचे कोपरे हे या दोघी मिळून खातात. खरंच की… आणि झिबू… तिची कलाकुसर जरा जास्तच… कोकोला खेळणी मिळाली की विषय एण्ड. पण राग आला कोकोला तर मात्र वाट. कुठेही सू सू करते रागानी… घ्या, आता करा क्लीन म्हणत निघून जाते. एरवी इतकी छान पोट्टी ट्रेन्ड असणाऱया आमच्या मुलीसाठी घरातलं एक टॉयलेट आहे, पण राग आला की… विचारायचं नाही. पेपर फाडते, आरडाओरड आणि सू सू ठरलेलं. म्हणून कापडाचा सोफा बदलून लेदरचा आला त्या जागी. हसत हसत नेहा म्हणाली.

एवढय़ात जहांगीर बाहेर आला. थोडी मस्ती केली कोकोशी आणि गोडुले दात दाखवत परत आत गेला. अगं लहान असताना 2-3 वेळा डॉग फूड खाल्लंय त्याने. आताही कधीकधी खातो. द्राक्ष असतील तर आधी अर्ध यांना भरवणार. उरलेलं अर्ध तोंडातून बाहेर काढणार त्याच्या आणि मग स्वतः खाणार. काय बोलू? सो क्यूट गं.

खायचे प्यायचे पण अतिलाड नाहीत याचेपण आणि मुलांचेपण. कोको आणि झिबूचं जेवणं समोर ठेवणार. 15 मिनिटात नाही खाल्लं तर सरळ उचलून आत. त्यामुळे शिस्त लागते. कसली शिस्त हवीय गं यांना… दोघी उडय़ा मारून परत माझ्या अंगावर आल्या आणि पंजे मारून मसाज मागून घेत होत्या.

‘फजूबॉल, चेरी, पिकू, साशा आमच्याकडे आले, राहिले, पण काहीना काही त्रास त्यांना झाला. पण सुर्दैवाने आमची ही चॅप्टर पिल्लं मस्त आहेत’ गॉड विल मस्तच राहू देत.

घराला घरपण देणारी आमची झिबू आणि हवहवासा वाटणारा अस्ताव्यस्त पसारा करणारी आमची कोको… आमचं षटकोनी कुटुंब पूर्ण करणारी आमची पिल्लं.