
अदिती सारंगधर,[email protected]
मधुगंधा कुलकर्णी–परेश मोकाशी फक्त टप्पू–चिमूचेच नव्हे तर त्यांच्या इमारतीतील आणि रस्त्यावरील सगळ्या डॉगूंचे आई–बाबा.
अशा काही व्यक्ती असतात ज्यांच्याशी बोलताना आपण नक्की कुठे आहोत, काय वाचायला हवं, काय बघायला हवं कळतं आणि त्यांचे चित्रपट बघताना, ऐकताना आपण खूप पुढे जाऊन विचार करायला हवा असं वाटतं. त्यांच्या कामातली प्रगल्भता आणि त्याचवेळी भावणारं साधेपण मनाला आनंदी करून जातंच, पण त्यांची प्राण्यांविषयीची आस्था आणि प्रेमही चित्रपटातून समोर येतं. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी.
अनेक नाटकांतून मालिकांतून अभिनेत्री म्हणून समोर आलेली परेशची नायिका, सखी, सहचारिणी मधुगंधा कुलकर्णी, ‘आजचे आपले जिवलग’, ‘टप्पू आणि चिमूचे आई बाबा’. खरं तर मधुगंधाची हीच सगळय़ांसमोर आलेली ओळख, पण प्राण्यांसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी शंभर टक्के झटणारी मधुगंधा प्राणीप्रेमी. त्यांच्या हक्कासाठी लढणारी आणि समूह तयार करून सेना तयार करून झगडणारी… शंभर टक्के खरीखुरी मधुगंधा. मधु!
खूप दिवस हो नाही करीत वेळ साधून अखेर झालं आमचं बोलणं. खरं तर टप्प्याटप्प्याने टप्पू मी नेहमी बऱयाचदा वाचते आणि त्यामुळे टप्पू आणि चिमूला न भेटताही माझी मैत्री आहे. त्याची मस्ती, त्याचं प्रेम, त्यांची इटुकली पिटुकली भाडणं… लपाछपी… हट्ट… नाटकं… लाड करून आणि पुरवून घेणं सगळं मी व्हिडीओमधून बघितलंय आणि ब्लॉगमध्ये वाचलंय. पण त्याच्या अजून गमतीजमती ऐकण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खास आमचं ‘जिवलग’.
‘अगं मी लहानपणापासून दहावीपर्यंत लोणावळय़ातच वाढलो. त्यामुळे प्राणी, पक्षी, झाडे आणि मी सगळे एकत्रच मोठ्ठे झालो. जंगली निसर्गरम्य वातावणात कुत्री 10-12, साप, घोरपडी यांचे नेहमीच वास्तव्य असायचं घरात. खुऱया वातावरणात मनसोक्त बागडायचे सगळेच. पण मुंबईत आल्यावर कितीही प्रेम आणि आवड असली तरी मुंबईच्या काटय़ावर आणि बंदिस्त, छोटय़ा घरात त्याचा कोंडवाडा करणं मला पटतच नाही. आपल्या सोयीनं त्यांना फिरायला न्यायचं. आपल्या आनंदासाठी समाधानासाठी त्यांना साधन का म्हणून करायचं? बरोबर नाहीच हे. आपली आवड जपण्यासाठी अनेक संस्था आहेत. जिथे त्यांचं उत्तम संगोपन केलं जातं तिथे जाऊन यावं. त्यांना मोकळं जगू द्यावं. खरं तर बोलता बोलता सहज मी आणि मधुगंधा याविषयी बोललोही होतो.
एक दिवस रेस्क्यू करण्यासाठी आणि शेल्टरसाठी गेली असताना ऍडॉप्शनसाठी टप्पू तिथं आला होता. त्याला चांगलं घर मिळणं आणि माणसं मिळणं हे घराच्या आकारापेक्षाही खूप महत्त्वाचं होतं म्हणून उचललं त्याला आणि आणलं घरी. त्याच्याबरोबर ऍडजस्ट होता होता सहा महिने गेले. टप्पू म्हणजे उडाणटप्पू… प्रेमानेच पण मस्तीखोर आपल्या मर्जीचा राजा… पण जरी एवढीशी असली तरी या डॅशहाऊंडची ऍटीटय़ूड एक्स्कयूज मी प्लीजचंच. काही दिवसांनंतर असं जाणवायला लागलं की कितीही त्याचे लाडकं खेळणं बॉल आपण दूर फेकायचा तो आणून देणार किंवा आपण तो पकडण्यासाठी पळायचं. लपाछपीच खेळायची असली तरी काम, लिखाण आणि मस्तीचा वेळ थोडा कमी पडत होता म्हणून त्याच फ्रेंडकडून टप्पूला पार्टनर आणली चिमू. इवलीशी चिमुकली होती म्हणून खरं तर चिमू… पण नावाला साजेसं वागेल तर ती चिमू कुठली. आमचा टप्पू जरा इमोशनल शांत स्वभावाचा आहे, तर चिमू अत्यंत स्थितप्रज्ञ वृत्तीची अग्रेसिव्ह आणि आपले म्हणणेच खरं करणारी शिस्तप्रिय कुत्री. इतकी की ‘पाणी पी जरा’ म्हटल्यावर नको असलं तरी शब्दाचा मान राखण्याखातर एक घोट पाणी पिणारी.
या विरोधी स्वभाव वैशिष्टय़ांमुळे खूपच गंमत येते त्यांची… ‘टप्पूला पकड’ म्हटलं तर कार्टून जाऊन डायरेक्ट मान पकडते त्याची थेट. टप्पू पण सुमडीत कोंबडा आहे. हाड खायला दिलं की आपलं हाड तसंच ठेवून देईल. चावायबिवायचे कष्ट न घेता. जवळ येऊन चिमूने चावून मऊ केलेलं हाड मागतो. डांबरट… परेश काही देत नाही. मग मलाच आपली दया येते. चिमूला दुसरं हाड चावायला देऊन हे त्याला देते. खाण्याची तर प्रचंड नाटकं. रॉयल कॅनिनचं मुख्य जेवण असतं. पण दही भात, अंडे असे पदार्थ त्याला आवडतात. पण रोज रोज तेच जेवून कंटाळा येतो. टप्पूला मग जेव रे बाळा… जेव रे बाबा करत मी आणि मावशी बाळाच्या मागे… नाहीच कधी तर वेगळं बनवून द्यायचं काहीतरी. आपल्या जेवणात हावरटासारखा टप्पू नाही बघणार. पण चिमू त्याच्याविरुद्ध… सगळं हवं असतं खायला आपल्या ताटातलं पण आणि दुसऱयाच्या ताटातलं पण… लोणी हा दोघांचा फार प्रिय आणि जवळचा विषय आहे. काही फळं डॉक्टरांच्या सल्ल्यानं देतो त्यांना, पण गाजर आणि काही भाज्या खूप आवडतात आम्हाला… सकाळी उठून फिरायला जाणे, जेवणे, झोपणे, खेळणे, जेवणे, फिरायला जाणे, झोपणे आणि अखंड मस्ती करणे हा त्यांचा साधारण दिनक्रम. पण त्यापेक्षाही मज्जा जेव्हा अगदी नियमित त्यांना आऊटींगला घेऊन जातो ना तेव्हा येते. डेला, ताजची बरीचशी रिसॉर्ट पेट फ्रेंडली आहेत. आणि अशीच शोधून त्यांना तिथे घेऊन जातो. कारण आम्हीच सुट्टीवर जातानाचा त्यांचा चेहरा सुट्टीभर मनात राहतो आणि मज्जा नाही येत. त्यापेक्षा त्यांच्याबरोबर घालवलेली सुट्टी खूपच समाधानकारक असते. सकाळी एकत्र त्यांना घेऊन फिरायला जायचं. येऊन लिखाण. मग मुलांबरोबरची अखंड मस्ती आणि त्यांचे सुखावलेले चेहरे अजून काय हवंय… बायोलॉजिकल नसलो तरी मायालॉजिकल पालक आहोत ना त्यांचे…
टप्पूची एक गंमत ऐक. आमच्या वर राहणाऱया एकाकडे दिवसभर नळ सुरू राहिला आणि घरभर पाणी झालं. खाली राहणाऱया आमच्या संपूर्ण घरात ओल आली. नवीन केलेला पेंट खराब झाला. चिपाडं निघायला लागली. खूपच चिडलो होतो आणि वाद टोकाला पोहोचला, इतकं की आम्ही समोर येता जाता एकमेकाचं तोंड बघत नव्हतो. एक दिवस टप्पूला फिरवायला नेलं होतं आणि ते समोरून आले. अचानक टप्पूकडे आस्थेने मायेने बोलले. चौकशी केली. लंडनला त्यांच्याकडेही असाच डॉग असल्याचं सांगितलं. खूप वेळ खूप बोलत राहिले. राग कुठच्या कुठे विरून गेला. नुसत्या गप्पा नाही चहाला जायला लागलो त्यांच्याकडे. टप्पूमुळे आमच्या कट्टीची फूल बट्टी झाली. घट्टवाली बट्टी.
मला बिल्डिंगमधल्या सगळय़ा कुत्र्यांचंसुद्धा करायला आवडतं प्रेमापोटी. आधी रस्त्यावरच्या कुत्र्यांचा खूप त्रास व्हायचा. बिल्डिंगमध्ये कधी कुत्री चावायची पण. कधी अंगावर धावून यायची. त्यामुळे पेट लव्हर्स आणि पेट हेटर्स असे दोन ग्रुप पडले. शेवटी मी मध्यस्थी केली आणि म्हटलं खायला नाही दिलं, प्यायला नाही मिळालं तर भुकेली कुत्री अग्रेसिव्ह होणारच. जवळ नका करू पण जगू द्या त्यांना. माणसानं जशी कमीतकमी पाच झाडं लावली पाहिजेत तसं किमान पाच प्राण्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मदतही केली पाहिजे. माणसांच्या समान हक्कांसाठी लढतो ना मग प्राण्यांना का दुर्लक्षित करायचं. त्यांनाही काही हक्क असायलाच हवेत. माणसाचा नकोच पण नागरिकत्वाचा दर्जा द्या की त्यांना. माझी कळकळ पोहोचली बहुतेक बिल्डिंगमधील लोकांपर्यंत. आज बिल्डिंग मेंटेनन्स फंडातून त्यांच्यासाठी जेवण आणलं जातं. पाणी दिलं जातं आणि ते बघणारा एक मुलगा अपॉइंट केलाय.
असंच अगदी काही दिवसांपूर्वी आम्ही काही मित्र मी, ओंकार.. कुत्र्यांना फूड मिळत नाही अशा ठिकाणी गाडीत फूड टाकून त्यांना द्यायला गेलो तर अंगावरून गाडी गेलेलं तीन दिवसांचं पिल्लू सापडलं. कणा कामातून गेला होता. गाडीत टाकलं, डॉक्टरांकडे नेलं. काहीच आशा नव्हती. डॉक्टरांनी 100 टक्के प्रयत्न केले. आज इकडून तिकडे पळतंय गं ते पिल्लू. व्हिडीओ बघून डोळय़ात पाणी आलं. कितीही सुपरहिट फिल्म्स करा, कितीही मोठे मोठे पुरस्कार हातात धरा… करोडो रुपयांचा चेक बँकेत वटवा, पण हे जे समाधान एका जीवाला जीवन देण्याचं ते नाही मिळणार जगात कुठेच. खरंच सांगते अदिती आज मी खूप श्रीमंत आहे कारण माझ्याकडे या माझ्या पिल्लांच्या… त्यांच्या मित्रांच्या आठवणींचा ठेवा आहे. या कुपीतल्या अनुभवाचं, भावनांचं अत्तर सतत माझं, आमचं आयुष्य सुगंधीच करत राहील.























































