
>> प्रणव रावराणे
पुस्तक, मी आणि रिकामी संध्याकाळ हे जुळून आलं की कोणतंही पुस्तक हातात घ्यावं आणि त्यात हरवून जावं. अशा जुळून येणाऱ्या वेळेसाठी काही पुस्तकं, काही लेखक ठरलेले असतात. यात हक्काने नाव घ्यावं असे लेखक म्हणजे पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शिवाजी सावंत. आपलं मराठी साहित्यजगत या नावांशिवाय अपूर्ण आहे. शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय हे माझं अत्यंत आवडीचं पुस्तक. कधीही, कुठेही ते पुस्तक वाचलं तरी पुस्तकातल्या प्रत्येक वाक्याची नव्याने प्रचिती आपल्याला येते. तो काळ आपल्यासमोरच उभा असावा इतका दृश्यपरिणाम या पुस्तकातून मला अनुभवास येतो. पु. ल. देशपांडे यांची सर्वच पुस्तकं सर्वांच्याच आवडीची आहेत. व्यक्ती आणि वल्ली, बटाटय़ाची चाळ, गणगोत अशा सर्वच पुस्तकांची असंख्य पारायणं पुलंच्या वाचकांनी केली आहेत. यामुळेच माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या पुस्तकातली वाक्यंच्या वाक्यं पाठ आहेत. आपल्या वाचनप्रवासाचा श्रीगणेशा करायचा तर पुलंच्याच पुस्तकांनी. त्यांचं असंच एक पुस्तक जे वाचायचं राहून गेलं होतं ते म्हणजे खिल्ली. अगदी आजच्या काळालाही साजेसा असा विनोदांचा संदर्भ असणारं हे पुस्तक पुलंचं साहित्य कालातीत आहे हे सार्थ करणारं वाटलं.
आवडत्या लेखकाच्या यादीतील एक नाव म्हणजे सुहास शिरवळकर. त्यांचं दुनियादारी पुस्तक अत्यंत आवडतं. अगदी नाटकाचा प्रयोग सुरू असताना विंगेतही हातातून न सोडवता येणारं असं हे पुस्तक आहे. दुनियादारी चित्रपटाच्या निमित्ताने ते अनेकदा वाचलं. कॉलेजमधला तो काळ पुस्तकातून पुनः पुन्हा अनुभवणं वेगळंच. याबरोबरच मला अत्यंत आवडणारं पुस्तक म्हणजे चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यावरील पुस्तक हसरे दु:ख. जगण्याचं एक वेगळं तत्त्वज्ञान मांडणारं, कलावंताच्या आयुष्यातील सूक्ष्म सुखदु:खाच्या सूक्ष्म रेषा मांडणारं असं हे पुस्तक आहे असं मला वाटतं. असंच आणखी एक पुस्तक म्हणजे जावेद अख्तर यांचं ख्वाब के गांव मे. अतिशय तरल संवाद साधणारं असं हे पुस्तक आहे.
नाटय़क्षेत्रात काम करताना वाचनाला आकार देणं गरजेचं असतं. यादरम्यान अनेक पुस्तकं वाचली. यात आवडलेले लेखक नाटककार म्हणजे जयंत पवार. त्यांचं सर्वच लेखन हे एका वेगळय़ा पातळीवर नेणारं आहे. यामुळे त्यांची सर्वच पुस्तकं, कथासंग्रह आवडतात, परंतु यात सगळय़ात जास्त आवडलेली कथा म्हणजे तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य. मानवी जीवनाचे स्तर उलगडणारी कथा आपल्याला खिळवून ठेवते. याबरोबरच या कथेतील पेच, गुंते आणि त्यांची होणारी उकल वाचक म्हणून आपली उत्कंठा कायम ठेवतात. कथालेखनातील हा वेगळा प्रयोग आहे असंच म्हणावं लागेल. मला सर्वच प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात. हातात आवडतं पुस्तक असलं की काळवेळाचे बंध आपोआप बाजूला पडतात हा अनुभव अनेकदा घेतला आहे. म्हणूनच पुस्तकांची सोबत कायम हवीहवीशी वाटते. शब्दांकन: शुभांगी बागडे


























































