
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
फेसबुक हे सोशल मीडिया माध्यम आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (एआय) मदतीने जगाचा नकाशा बनविणार आहे. या नकाशात प्रामुख्याने आफ्रिका खंडाचा संपूर्ण समावेश असणार आहे. या नकाशाद्वारे फेसबुक जगाच्या लोकसंख्येचे मॅपिंग करणार आहे. यापूर्वी फेसबुकने 2016 साली जगातील 22 देशांमधील लोकसंख्येचे मॅपिंग केले होते. आता त्यांनी जगभरातील लोकसंख्येचे मॅपिंग करण्याचा संकल्प सोडला आहे. याचा फायदा जगभरातील आरोग्य संघटनांना होणार आहे.
याबाबत माहिती देताना फेसबुकने आपल्या ब्लॉगपोस्टवर लिहिले आहे की, एकदा हा नकाशा तयार झाला की, लोकहिताची कामे करणाऱ्या संघटना त्याचा वापर करू शकतील. या मॅपिंगमुळे जगाच्या कोणत्या भागात किती लोकसंख्या आहे ते त्यांना कळू शकेल. त्या आधारे या संघटना आरोग्याच्या सेवा जास्त चांगल्या प्रकारे पुरवू शकतील. साधारण दोन वर्षांपूर्वीच फेसबुकने पॉप्युलेशन मॅपिंगच्या दृष्टीने आपले पाऊल टाकले आहे.
ऍप्सना योग्य दिशा दाखवणार
आपल्या मॅपिंग योजनेच्या संदर्भात फेसबुकने लिहिले आहे की, या योजनेद्वारे फेसबुक ही कंपनी अनेक ऍप्सना योग्य दिशा दाखवण्याचे काम एक गाईड म्हणून करणार आहे. या मोजणीमध्ये सॅटेलाइट डेटाचा वापर केला जाणार असला तरी त्यात कुठल्याही प्रकारची खासगी माहिती मात्र पुरवली जाणार नाही. फेसबुकचे हे मॅपिंग संशोधकांना फायद्याचे ठरणार आहे.






























































