व्याजावर जगण्याचे दिवस संपले! व्याजदरात मोठी कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आणि वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी केंद्रातील मोदी सरकारने आता पै-पै जमा करून केलेल्या बचतीवरील व्याजदरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे बँकेत, पोस्टात बचतीचे पैसे ठेवून व्याजावर जगण्याचे दिवस आता संपले असून, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, मध्यमवर्गीयांना फटका बसला आहे.

कोरोनामुळे कोटय़वधी लोकांचे रोजगार गेले. अनेकांची बचतही संपली आहे. ज्यांनी बँक आणि पोस्टात पैसे गुंतविले त्यांचे जगणेच केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आणखी कठीण बनणार आहे. उद्यापासून (दि. 1) 2021-22 चे आर्थिक वर्ष सुरू होत असून, या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने मोठी व्याजकपात केली आहे.उद्यापासून (दि. 1) या व्याजकपातीची अंमलबजावणी होणार आहे.

अशी होणार व्याजकपात

  • पीपीएफवरील व्याजदर 7.9 टक्क्यांवरून 6.4 टक्के केला आहे. 0.7 टक्क्यांनी ही कपात केली आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत ही व्याजदर कपात असेल.
  • मुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने अनेक पालक सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूक करतात. मात्र या योजनेत व्याजदरात 7.6 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्किममधील गुंतवणुकीवरील व्याजदरात 90 बेसिक पॉईंटने कपात केली आहे. आता 6.5 टक्के एवढा व्याजदर राहील.
  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील (एनएससी) व्याज दर 6.8 टक्क्यांवरून 5.9 टक्के केला आहे. तब्बल 0.9 टक्के व्याजदर कपात आहे.
  • किसान विकासपत्रचा व्याजदर 6.9 टक्क्यांवरून 6.2 टक्के केला आहे. तसेच 124 महिन्यांऐवजी तब्बल 138 महिन्यांपर्यंत मॅच्युरिटी कालावधी वाढविला आहे.
  • बँकेतील बचत ठेवीवर 1 वर्षासाठी सध्या 4 टक्के व्याज होते. आता 3.5 टक्के मिळेल. 5 वर्षांसाठी बचत ठेवीवर 6.7 टक्के व्याज मिळत होते. उद्यापासून 5.8 टक्के मिळेल. पाच वर्षांसाठीच्या रिकरिंगवरील व्याजात 50 बेसिक पॉईंटने कपात करून 5.3 टक्के केली आहे.