मध्य आणि पश्चिम रेल्वेचा वेग मंदावला; प्रवाशांचे हाल

सोमवारी सकाळी बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प पडली होती. याचा परिणाम बुधवारी देखील पाहावयास मिळाला. बुधवारी दुपारी 1 ते 4 वाजेच्या यादरम्यान पश्चिम रेल्वेची लोकल सेवा 25 ते 30 मिनिटे उशिराने सुरू होती. यामुळे भर उन्हाच्यावेळी प्रवाशांचे हाल झाले.

पश्चिम रेल्वेसोबतच मध्य रेल्वेची वाहतूक देखील वेळेत नसल्याचे निदर्शनास आले. गेल्या शनिवारी व रविवारी 36 तासांच्या जम्बो मेगा ब्लॉकनंतरही मध्य रेल्वेवरील उपनगरीय लोकल ट्रेन उशिरा धावत असल्याने प्रवासी हैराण असल्याचे चित्र आहे.

बुधवारी मध्य रेल्वेची वाहतूक 25 ते 30 मिनिटे उशिराने सुरू होती. मध्य रेल्वेवर याबाबत उद्घोषणाही केली जात होती. काही अपरिहार्य कारणांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू असल्याचे सकाळी साडेदहाच्या सुमारास सांगण्यात येत होते. याचे पडसाद सोशल मीडियावर उमटलेले पाहावयास मिळाले. प्रवासी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत होते.