नोकरदार वर्गाला खूशखबर; नोकरी बदलल्यास ग्रॅच्युइटी बदलता येणार, लवकरच होणार अधिकृत घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील नोकरदार वर्गाला लवकरच गूड न्यूज मिळणार आहे. एखाद्या कंपनीतून दुसऱया कंपनीत गेल्यास पीएफप्रमाणे ग्रॅच्युइटीदेखील वर्ग करण्याची मुभा केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाबरोबर  ग्रॅच्युइटी रचनेतदेखील बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

केंद्र सरकारतर्फे  ग्रॅच्युइटीच्या रचनेत बदल करण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने कर्मचारी संघटना आणि उद्योग यांच्यातील  ग्रॅच्युइटीच्या रचनेत बदल केला जाणार आहे. त्याचबरोबर ग्रॅच्युइटी ही सीटीसीचा एक आवश्यक भाग बनविण्यासदेखील प्रयत्न सुरू असून येत्या महिनाभरात याबाबत निर्णय घेतला जाईल. नियमानुसार वर्षभराच्या नोकरीवर 15 दिवसांच्या पगाराइतकी  ग्रॅच्युइटी मिळते. त्यातदेखील वाढ करण्याची मागणी केली जात असून ती 30 दिवसांची करावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबतही निर्णय अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.

सलग पाच वर्षे नोकरी केल्यास मिळते ग्रॅच्युइटी

एखाद्या कंपनीत सलग पाच वर्षे काम करणाऱया कर्मचाऱयाला  ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. यात पगाराचा एक छोटासा भाग ग्रॅच्युइटीसाठी वजा केला जातो. नोकरी सोडली अथवा शेवटच्या पगारामध्ये मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता किती आहे यावरदेखील  ग्रॅच्युइटी अवलंबून असते.

कोणत्या संस्थेत मिळतो ग्रॅच्युइटीचा फायदा

पेमेंट ऑफ  ग्रॅच्युइटी ऍक्ट 1972 नुसार ज्या कंपनीत दहापेक्षा अधिक कामगार काम करतात त्या प्रत्येक संस्थेमध्ये ग्रॅच्युइटीचा लाभ मिळवता येतो. जर कर्मचाऱयाने नोकरी बदलली किंवा सोडली, निवृत्त झाला तर ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले असतील तर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.