
सामना ऑनलाईन । मुंबई
माटुंगा स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या स्लो मार्गावरील रुळाला हा तडा गेला आहे. यामुळे कल्याणकडून येणाऱ्या स्लो लाईनवरील गाड्या फास्ट लाईनवर वळवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 15 ते 20 मिनिटाने उशिरा सुरू असून याचा परिणाम दिवसभराच्या वेळापत्रकावर पडण्याची शक्यता आहे. लोकल उशिरा धावत असल्याने आणि गाड्यांमधील गर्दी वाढत चालल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. मध्य रेल्वेने रुळ दुरुस्तीचे काम सुरू केले असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.



























































