
प्रवाशांच्या करमणुकीसाठी मध्य रेल्वेने आपल्या चार स्थानकांत सिने डोम उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात डोंबिवली, खोपोली, जूचंद्र आणि इगतपुरी स्थानकांत प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्यात येणार आहे. सुमारे पाच हजार चौरस फूट एवढे क्षेत्रफळ असणार आहे. नॉन फेअर रेव्हेन्यूअंतर्गत सदरचे डोम खासगी संस्थांच्या माध्यमातून उभारून चालवण्यास दिले जाणार आहेत.
त्यासाठी रेल्वेने नुकत्याच निविदा मागवल्या आहेत. रेल्वेकडून उभारण्यात येणाऱया या सिने डोममध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यासाठीची संपूर्ण व्यवस्था असणार आहे. तसेच प्रवाशांना, सिनेरसिकांना चित्रपट पाहता येणार आहेत. या सिने डोमचे व्यवस्थापन, ते चालवण्याची जबाबदारी, गर्दीचे नियोजन करणे आदी बाबी खासगी संस्थांकडे दिल्या जाणार असल्या तरी त्यांना त्यामध्ये कायमस्वरूपी बांधकाम करण्याची परवानगी असणार नाही, मात्र कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, वर्षाला संबंधित संस्थांना लाखो रुपयांचे शुल्क मोजावे लागणार आहे.


























































