लोकलची रोजची ‘अडवणूक’ बंद होणार!

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये उघड्या असलेल्या रेल्वे फाटकांमुळे उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक नेहमी बिघडत असते. या रेल्वे फाटकांना वाहनांना जाण्यासाठी फार काळ उघडे ठेवावे लागत असल्याने त्याचा सकाळच्या पिकअवरमध्ये धावणाऱ्या लोकल गाड्यांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमधील कळवा, दिवासह सर्वाधिक ट्रफिक असणारी चार रेल्वे फाटके 2019-20 या आर्थिक वर्षात बंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. नव्या मंत्रिमंडळाचा पदभार स्वीकारताच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचा रोड मॅप जारी केला आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या उपनगरीय हद्दीतील सर्व रेल्वे फाटके एक-एक करीत बंद केली आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये रेल्वे फाटकांचे दुखणे कायम आहे. दोन सरकारी संस्थांमधील योग्य समन्वयाअभावी सामान्य प्रवाशांचे रोजचे हाल होत आहेत. प्रवासी संघटनांना याच्याशी काही घेणेदेणे नसते. त्या तांत्रिक दोषाबद्दलही ज्यांचा काही संबंध नाही त्या स्टेशन मास्तरांची गचांडी पकड असतात.

प्रवाशांना फटका
गर्दीच्या वेळेत एक गाडी जरी तीन ते चार मिनिटे रखडली तरी त्याचे गणित वाढत जाऊन सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत त्याचा जबर फटका बसतो. गाड्यांच्या काही मिनिटांचे लेट होणे नंतरच्या तासाभराच्या विलंबाला जबाबदार ठरते. दिवा येथे गेले काही वर्षे प्रचंड वस्ती वाढल्याने शहरी वाहनांसाठी येथील रेल्वे फाटक दिवसाला तब्बल 35 वेळा उघडावे लागते. ठाकुर्ली येथे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने येथील रेल्वे फाटक बंद झाले आहे. मात्र टिटवाळा, शहाड ते आंबिवली, दिवा, कळवा, चुनाभट्टी, शिवडी येथे मध्य रेल्वेची फाटके अजूनही सुरू असून त्यामुळे लोकलची रोजची अडवणूक होत असते, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

ही फाटके अडवतात लोकलची वाट
टिटवाळा, शहाड-आंबिवली,दिवा, कळवा,चुनाभट्टी, शिवडी
दिवा येथेही उड्डाणपूल उभारून फाटक कायमचे बंद करायवाचे आहे. येथे इतर ठिकाणांप्रमाणेच रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे काम केव्हाच झाले आहे. आधी पुलाला उतार देण्यासाठी पालिका हद्दीत जागेची अडचण होती. रेल्वेने पुलाच्या डिझाईनचे टेंडर मंजूर करून जागेचे सर्वेक्षण सुरू केले आहे. – अनिल कुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

आपली प्रतिक्रिया द्या