
अंबा माता की जय… असा गजर करीत उद्या शनिवारपासून ठाण्याच्या छत्रपती शिवाजी मैदानावर चैत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने कला व भक्तीचा अनोखा संगम होणार असून सहस्रचंडी महायज्ञ, शास्त्रीय संगीताची मैफल, लोकसंगीत, गोंधळ, रास गरबा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 300 जणांचे लेझीम पथक तसेच आळंदीहून शंभर बाल वारकरी सहभागी होणार असून तलावपाळीच्या काठावर भक्तीचे तरंग उमटणार आहेत.
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून सुरू होणारा हा उत्सव 10 एप्रिलपर्यंत चालणार असून यंदाचे 14वे वर्ष आहे. या उत्सवात संगीत, नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकार आपली कला देवीच्या दरबारी पेश करणार आहेत. उद्या शनिवारी कळवा येथून सकाळी 11 वाजता देवीचे वाजतगाजत आगमन होईल. त्यात वारकऱ्यांची पथके, झांज व बँड पथक, घोडेस्वार, मावळे पारंपरिक वेषात सहभागी होणार आहेत. हा चैत्र नवरात्रोत्सव ठाण्याच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेत महत्त्वाचा असल्याची माहिती आयोजक व खासदार राजन विचारे यांनी दिली.
2 एप्रिल रोजी ‘दादूस आला रे…’ हा कार्यक्रम होणार आहे, तर 3 एप्रिलला निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होईल. सोमवार 4 एप्रिल रोजी नीलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया-रास गरबा आयोजित केला आहे. मंगळवार, 5 एप्रिल रोजी देवीचा जागर व गोंधळ होणार असून 6 एप्रिलला मराठमोळा दांडिया व भोंडला होईल. या वेळी शिवसेना सचिव व सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर उपस्थित राहणार आहेत. गुरुवार, 7 एप्रिल रोजी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 8 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता तरंगत्या रंगमंचावर मंजुषा पाटील व संजीव अभ्यंकर यांची मैफल रंगणार आहे. ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर व शौनक अभिषेकी यांचीही मैफल होईल, अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.
लता मंगेशकर यांना आदरांजली
चैत्र नवरात्रोत्सवात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. ९ एप्रिल रोजी प्रीती निमकर, धनश्री देशपांडे व नचिकेत देसाई हे कलाकार लता मंगेशकर यांची गाणी सादर करतील.



























































