
बेकायदेशीर कर्ज वाटपप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 5 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोचर यांचा जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने आज मंजूर केला. कोचर यांची सुटका करतानाच तपास यंत्रणेच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये तसेच इतर काही अटी न्यायालयाने घातल्या.
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओपदी असताना चंदा कोचर यांनी 2018 साली व्हिडीओकोन समूहाला बेकायदेशीररीत्या कर्ज दिले होते. त्यामुळे बँकेने कोचर यांची हकालपट्टी केली. या दोघा पती-पत्नीना ईडीने मनी लॉण्डरिंगप्रकरणी अटक केली असून दोघांविरोधात चार्जशीट ही दाखल केली आहे. त्यानंतर चंदा कोचर यांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायमूर्ती अभिजित नांदगावकर यांच्यासमोर चंदा कोचर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. न्यायाधीशांनी कोचर यांचा पाच लाख रुपयांच्या बॉण्डवर जामीन मंजूर केला.



























































