जिल्हापरिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत हडकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत राजाराम हडकर (वय ७०) रा. चिंदर, मालवण यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना मालवण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्राणजोत मालवली.

चिंदर गावठणवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल करणारे हडकर कै. आप्पा गोगटे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात. चिंदर गावचे सरपंचपद त्यांनी तब्बल ११ वर्षे भूषवले. आचरा जि प मतदार संघातून विजयी होत त्यांनी अनेक विकासकामे केली. ग्रामस्थांशी त्यांचे आपुलकीचे नाते होते. आमदार वैभव नाईक यांच्या कार्याने प्रेरित होत दोन वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्दोजक तथा शिवसेना कार्यकर्ते समीर हडकर व प्रसिद्ध व्यावसायिक विकास हडकर यांचे ते वडील होत.