चंद्रपुरात उभारण्यात आले ‘टच फ्री सॅनिटायझेशन केंद्र’

675

चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभाग व पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व सीमा सील करून कोरोना संकटाला थोपवून धरले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती निवारण कक्षापुढे राज्यातील पहिल्या ‘टच फ्री सॅनिटायझेशन’ प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कुठल्याही हँडवॉशला स्पर्श न करता कर्मचारी व नागरिकांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण शक्य होणार आहे. कुठल्याही निर्जंतूक करणाऱ्या द्रव्याला हात न लावता मनुष्य निर्जंतुकीकरण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षात सर्व यंत्रणांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे कर्मचारी एकत्रितरित्या काम करत आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांनाही कोरोना बाधित होण्याचे भय आहे. याशिवाय याच केंद्रात जिल्हाभरातील नागरिकांची विविध सहाय्यता व सल्ला विचारण्यासाठी ये-जा आहे. या नागरिकांना संपूर्ण निर्जंतुकीकरण करूनच कार्यालयात प्रवेश दिला जावा ही या मागची प्रमुख संकल्पना आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अशा पद्धतीची यंत्रणा उभारल्याने कोरोना बाधीत होण्याचे भय घटणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या प्रकल्पाचे कौतूक करत ही यंत्रणा अधिक संख्येत अस्थापना असलेल्या व नागरिकांची सतत ये-जा असलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येत उभारण्याची गरज व्यक्त करत तसे निर्देश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या