कामगार विभागातर्फे कामगारांना वाटप केल्या जाणाऱ्या साहित्यावर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी आपल्या नावाचे स्टिकर लावून शासकीय पैशाने प्रचार चालवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केलाय.
गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच्या बल्लारपूर मतदारसंघामध्ये कामगार आयुक्तांना सोबत घेऊन मजुरांसाठी असलेल्या साहित्याचे वाटप सुरू केले. हे साहित्य असलेल्या पेत्यांवर मुनगंटीवार यांनी स्वतःचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले स्टिकर लावले. या माध्यमातून ते स्वतःचा प्रचार करीत आहेत. हा गैरप्रकार आहे. याच साहित्याचे वाटप बल्लारपूर येथे केले जाणार होते. मात्र अपेक्षेपेक्षा अधिक कामगार तिथे पोचल्याने मोठा गोंधळ उडाला आणि वितरण रद्द करावे लागले. या गंभीर प्रकारची दखल घेत डॉ. गावतूरे यांनी आज कामगार आयुक्तांची भेट घेत तक्रार केली आणि दोषींवर कारवाईची मागणी केली.
हे साहित्य वितरित करताना पक्षपात केला जात असून पक्षाचे काम करणाऱ्या लोकांना तातडीने नोंदणी करून लाभार्थी केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. शिवाय बल्लारपूर वगळता इतर कोणत्याही मतदारसंघात या साहित्याचे वाटप का केले जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा सगळा गैरप्रकार आता वेळीच थांबवला नाही तर मोठे आंदोलन करू, असा इशाराही डॉ. गावतुरे यांनी दिलाय.