चंद्रपुरात नरभक्षक वाघ जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात नरभक्षक वाघाला आज दुपारी वन विभागाच्या पथकाने जिवंत पकडले. गेल्या काही महिन्यांत या आरटी-1 वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते. दोनच दिवसांपूर्वी हा वाघ पिंजरा तोडून पळाला होता, पण पुन्हा आज त्याला सापळा लावून पकडण्यात आले.

हा वाघ सुमारे वीस चौरस किलोमीटर परिसरात फिरत होता. त्याला पकडण्यासाठी मुख्य वन्यजीव रक्षक यांनी 14 फेब्रुवारी रोजी आदेश दिलेले होते. तेव्हापासून वन विभागाची पथके या वाघाच्या मागावर होती. पण तो हुलकावण्या देत होता.

वाघाला जीवंत पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 25 वनरक्षकांची चार पथके, 14 गावांतील 35 स्वयंसेवक यांच्यासह 4 पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी प्रयत्न करत होते. चांदा वन विभागातील राजूरा व विरुर वनपरिक्षेत्रात सिंदी गावा जवळ रेल्वेच्या पुलाखाली लावलेल्या सापळ्यात हा वाघ अडकला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

या वाघाला गोळ्या घालण्यासाठी वनविभागावर दबाव वाढत होता. वनविभागाने संयमाने परिस्थिती हाताळत वाघाला जेरबंद केल्याने परिसरातील हजारो नागरिक आणि वनविभाग कर्मचारी यांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाघाला जीवंत जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणाया पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्य़ांचे अभिनंदन केले आहे. वाघ जेरबंद झाल्यामुळे परिसरातील गावकऱ्य़ांनाही दिलासा मिळाला आहे.