चंद्रपुरातील ‘त्या’ लग्नपत्रिकेची तूफान चर्चा; शहरातील ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरला गोंडकालीन इतिहास लाभला आहे. या काळातील अनेक देखण्या वास्तू आजही येथे उभ्या आहेत. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी काही संस्था सरसावल्या आहेत. ऐतिहासिक वास्तु स्वच्छता, संरक्षण व पर्यटनासाठी जनजागृती करण्याचा आगळावेगळा प्रयत्न चंद्रपुरातील एका तरुणाने केला आहे. त्याने आपल्या लग्न पत्रिकेतून संवर्धनाचा संदेश दिला आहे. लग्न पत्रिकेतून संदेश देणाऱ्या तरुणाचे नाव सुनील मिलाल आहे. सध्या या लग्न पत्रिकेची तुफान चर्चा होत आहे.

प्राचीन लोकपूर, इंद्रपूर या गावापासून चांदा ते चंद्रपूर असा चंद्रपूर शहराचा प्रवास झाला आहे. गोंड राजवटीत शहराला वैभव प्राप्त झाले होते. त्यावेळी येथे अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती झाली. आजही या वास्तू इतिहासाची साक्ष देत येथे उभ्या आहेत. पुढे ब्रिटिश राजवट आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा, यासाठी प्रयत्न झालेत. या वास्तूंच्या संवर्धनासाठी इको प्रो या संस्थेचे श्रमदान सुरू आहे. या उपक्रमाला हळूहळू शहरवासीयांचेही योगदान मिळत आहे. व्यापक सहकार्य मिळवण्यासाठी आपला वारसा आपणच जपूया ही संकल्पना शहरातील सर्व नागरिकांमध्ये रुजवण्याची आज गरज असल्याचे बोलले जाते. अश्यात शहरातील भिवापूर वार्डातील सुनील राजन्ना मिलाल या तरुणाने आपल्या लग्न पत्रिकेतून संवर्धनाच्या अनमोल संदेश दिला. ही लग्नपत्रिका शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.