
>> चंद्रसेन टिळेकर
ज्योतिष हा विषय गेली पाच हजार वर्षे आपल्या समाजात घट्ट पाय रोवून बसलेला आहे. आपल्या समाजात दैववाद पसरविण्याचे मोठे दुष्कृत्य या कुशास्त्राने केले आहे. त्यात पुन्हा ज्योतिष हे वेदाचे सहावे अंग आहे, असे श्रद्धेचे बोटही चाणाक्ष मंडळींनी त्याला लावल्याने या विषयाची चिकित्सा जरा फुंकून फुंकूनच करावी लागते, पण अनेकांच्या लक्षात हे येत नाही की, कुठलेही भौतिक शास्त्र धर्माचा, धर्मग्रंथाचा भाग होऊच शकत नाही.
बाकी कुणी काहीही म्हणा, आमच्या देशवासीयांच्या श्रद्धेला जगात कुठे तोड असेल असे वाटत नाही. विज्ञान युगात राहूनही आम्हाला अज्ञानात रहायला आवडते. त्याचे कारण म्हणजे आम्हाला आनंदात रहायला आवडते आणि अज्ञानात आनंद असतो हे तर सर्वश्रुत वचन आहे. त्यातून कुठल्याही भव्यदिव्य गोष्टींशी आमचा थेट संबंध आहे हे आमचे आम्हीच ठरवलेले असते, मग तो ईश्वर -परमेश्वर असो, निसर्ग असो व कोट्यवधी अंतरावर फिरणारे ग्रहतारे असोत! आमच्या संसाराचा रथ आकाशातील ग्रहतारे हाकीत असतात. साहजिकच ते नेतील तिकडे त्यांच्या बरोबर जावेच लागते; परंतु काही वेळा मात्र ते चांगल्या रस्त्याने नेण्याऐवजी खाचखळग्यांनी समृद्ध असलेल्या रस्त्यावर आणून सोडतात. अशा वेळी आम्हाला यशाच्या महामार्गावर कोण आणून सोडत असतील तर ते आमचे फलज्योतिषी !
महाकाय असे ते फिरते गोळे आमच्या ज्योतिषाचार्यांनी आपल्या तेजबुद्धीने असे अंकित केले आहेत की, ते “ऊठ” म्हटले तर उठतात आणि “बस” म्हटले की, बसतात आणि का बसणार नाहीत? साऱ्या नवग्रहांची मोळी बांधून त्यांनी आमच्या रामभाऊ, राधाकाकू, बंड्या आणि सुलूच्या पत्रिकेत बसवले आहेत. अर्थात त्या नवग्रहांत सूर्य हा तारा आहे आणि चंद्र हा उपग्रहही आहे, पण आमच्या ज्योतिष्यांच्या मते ते ‘सब घोडे बारा टके’! सगळ्यात गंमत म्हणजे या नवग्रहांत दाखवलेत ते राहू-केतू हे ग्रह मुळी अस्तित्वातच नाहीत, पण याचा अचंबा ज्योतिष्यांनाही नाही आणि त्यांच्या चरणी लागणाऱ्या तुम्हाआम्हालाही नाही!
ज्योतिष या विषयावर आपल्या समाजातील भल्या भल्या नामवंतांचाही गाढ विश्वास असतो. या ठिकाणी मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक मा. विनायक यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ते एकदा प्रचंड आजारी पडले. कितीतरी दिवस ते अंथरुणाला खिळून होते. शेवटी त्यांचे नातेवाईक असलेले मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील महान व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.व्ही. शांताराम त्यांना भेटायला गेले. जाताना त्यांनी आपल्याबरोबर नामांकित अशा
डॉक्टरलाही बरोबर घेतले. डॉक्टरांनी मा. विनायकांना तपासले आणि ते व्ही. शांताराम यांना म्हणाले, “यांची तब्येत अत्यंत नाजूक अवस्थेत आहे. यांना आताच्या आता हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले पाहिजे.”
मा. व्ही. शांताराम तशी तयारी करू लागताच मा. विनायक त्यांना म्हणाले, “छे छे, मी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये भरती होणार नाही. माझ्या गुरुजींनी म्हणजेच माझ्या ज्योतिष्याने मला खात्रीपूर्वक सांगितलंय, आज रात्री बारानंतर तुमची ग्रहदशा बदलणार आहे आणि तुम्ही ठणठणीत बरे होणार म्हणून. तेव्हा मी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये भरती होणार नाही.” व्ही.शांताराम यांनी मा. विनायक यांना परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण मा. विनायक यांनी आपला हट्ट काही सोडला नाही.नाइलाजाने शेवटी त्यांनी त्यांचा निरोप घेतला. सकाळी उठल्यावर त्यांनी वृत्तपत्रांत बातमी वाचली की, मा.विनायक गेले (ही घटना त्यांनी आपल्या ‘शांतारामा’ या आत्मचरित्रात नमूद केली आहे).
ज्योतिष हा विषय गेली पाच हजार वर्षे आपल्या समाजात घट्ट पाय रोवून बसलेला आहे. आपल्या समाजात दैववाद पसरविण्याचे मोठे दुष्कृत्य या कुशास्त्राने केले आहे. त्यात पुन्हा ज्योतिष हे वेदाचे सहावे अंग आहे असे श्रद्धेचे बोटही चाणाक्ष मंडळींनी त्याला लावल्याने या विषयाची चिकित्सा जरा फुंकून फुंकूनच करावी लागते, पण अनेकांच्या लक्षात हे येत नाही की, कुठलेही भौतिक शास्त्र धर्माचा धर्मग्रंथाचा भाग होऊच शकत नाही. तेव्हा ज्योतिष हे वेदाचे अंग आहे असा दावा करणे म्हणजे ज्योतिषाची विज्ञानाच्या दारातूनच हकालपट्टी करून घेण्यासारखे.
मुळात म्हणजे या छद्म शास्त्राचा (स्युडो सायन्स) पायाच अशास्त्रीय आहे. हे शास्त्र असे मानते की, आकाशात फिरणाऱ्या ग्रहांचा पृथ्वीतलावर राहणाऱ्या मानवावर परिणाम होतो. तो कधी चांगलाही असू शकतो तर कधी वाईटही असतो. म्हणजे ग्रहांची कृपा अथवा कोप मानवावर होतो आणि त्यानुसार त्याला आयुष्यात यश मिळते अथवा अपयश मिळते किंवा त्याच्यावर संकट येऊ शकते. अशा वेळी त्या ग्रहाची पृथ्वीतलावर शांती केली तर मात्र तो आपल्या वाटेतून बाजूला होतो. हे सारे हास्यास्पद आहे.
जगातील नामवंत शास्त्रज्ञांनी ‘नेचर’ नावाच्या शास्त्रीय विषयाला वाहिलेल्या मासिकात अशी ग्वाही दिली आहे की, कुठल्याही ग्रहाचा कसलाही बरा-वाईट परिणाम मानवावर होत नाही. हे सगळं आता प्रकर्षाने इथे आठवायचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रांतून बातमी आली होती की, देशाच्या फुटबॉल फेडरेशनने एका ज्योतिष्याला पाचारण करून आपल्या खेळाडूंच्या पत्रिका त्याच्या स्वाधीन करून त्याला सल्ला विचारला की, यातले कोणते खेळाडू स्पर्धेत उतरवावेत आणि कोणते खेळाडू घरी बसवावेत म्हणजे टीमला विजय मिळेल. ही संताप आणणारी गोष्ट तर आहेच, पण त्या भाकितासाठी त्या ज्योतिष्याने मोजून बारा लाख दक्षिणा मागितली आणि फुटबॉल फेडरेशनने ती हसत हसत दिलीही. स्वकर्तृत्वावर विश्वास नसलेल्या एखाद्या सामान्य माणसाने हवालदिल होऊन ज्योतिष्याचे पाय धरणे वेगळे आणि फुटबॉल फेडरेशनसारख्या शासनाच्या अंकित असलेल्या संस्थेने असे आपल्या निर्बुद्धपणाचे प्रदर्शन करणे वेगळे हे कुणीही मान्य करील. खेळाडूचे नैपुण्य त्याचा नित्यनियमाने केलेला सराव, त्याचे कौशल्य यावर अवलंबून असते की वर फिरणाऱ्या शनी-मंगळ आदी ग्रहांवर अवलंबून असते?
आपल्या उत्कर्षासाठी ग्रह-ताऱ्यांकडे आशाळभूत नजरेने पाहणाऱ्या समाजाचा उद्धार त्याने कल्पिलेली कुठलीही शक्ती करणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत)


























































