शेतकऱ्यांची बँकांकडून कोंडी, आतापर्यंत फक्त आठ टक्के कर्जवाटप; महसूल मंत्र्यांची नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना बँकांकडून होणाऱ्या विलंबाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. बँकांच्या आडमुठय़ा धोरणावर टीका करत राज्यात आतापर्यंत केवळ 8 टक्केच पीक कर्जवाटप झाल्याची माहिती त्यांनी दिली.

दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. शहरी व ग्रामीण भागात 10 टक्के पाणीकपात लागू करण्यासोबतच, शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणे, चाऱ्याची टंचाई दूर करणे आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचे नियोजन करण्याबाबत अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीला जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि अधिकारी उपस्थित होते.

राज्यात सध्या 45 टक्क्यांवर पंचनामे पूर्ण

बँकांच्या आडमुठय़ा धोरणावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केल. राज्यात सध्या 45 टक्क्यांवर पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनाम्यांचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

केंद्रीय पथक दोन दिवसांत येणार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती समिती तीन स्वतंत्र पथकांद्वारे बीड-धाराशीव, यवतमाळ-वाशीम आणि अहिल्यानगर-सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.