अकरावी ऑनलाइन प्रवेशात यंदा मोठा बदल, पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारले तरी पुढे प्रवेशाची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशात यंदा मोठा बदल करण्यात आला आहे. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही प्रवेश नाकारणाऱया विद्यार्थ्यांना यंदा नियमित प्रवेश फेऱयांमधून बाद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना केवळ लगतच्या एका फेरीत प्रवेशाची संधी मिळणार नाही, मात्र त्यानंतर होणाऱया प्रवेश फेरीत अशा विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करता येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशात अधिक सुसुत्रता आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने यंदापासून प्रवेश प्रक्रियेत काही बदल केले आहेत. आतापर्यंत पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळूनही प्रवेश नाकारणाऱया विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश फेऱयांमधून बाद करण्यात येत होते. त्यामुळे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती. या विद्यार्थ्यांना नंतर विशेष फेरीत रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश दिले जात होते. त्यामुळे गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर मिळणाऱया प्रवेशात समाधान मानावे लागायचे. यंदा मात्र पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारणाऱया विद्यार्थ्यांना लगतच्या केवळ एका फेरीपुरतेच बाद ठरविण्यात येणार असून पुढील फेरीत प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

नेमके काय होणार…
समजा विद्यार्थ्याला पहिल्या नियमित गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, मात्र या विद्यार्थ्याने दिलेल्या मुदतीत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेतला नाही तर या विद्यार्थ्याला केवळ दुसऱया गुणवत्ता यादीतून बाद करण्यात येईल. मात्र हा विद्यार्थी नव्या निर्णयानुसार तिसऱया गुणवत्ता यादीसाठी अर्ज करू शकतो. यापूर्वी पहिल्या गुणवत्ता यादीत मिळालेले पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारणाऱया विद्यार्थ्याला पुढील
दोन्ही फेऱयांमध्ये प्रवेशाची संधी मिळत नव्हती.
– इनहाऊस कोटय़ातील प्रवेश ऑनलाइन प्रवेशाच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू राहणार आहेत.
– एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान गुण असल्यास जन्म दिनांकानुसार ज्येष्ठ विद्यार्थ्याला प्रवेशात प्राधान्य.
– जन्मदिनांकदेखील समान असल्यास विद्यार्थ्याच्या पूर्ण नावाच्या इंग्रजी वर्णाक्षरांच्या क्रमानुसार प्रवेश दिला जाणार.

मुंबई, पुणे विभागातील वगळलेल्या गावांमध्येही आता ऑनलाइन प्रवेश
मुंबई (एमएमआर) आणि पुणे (महापालिका) क्षेत्रातील यापूर्वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या गावांचा समावेशही ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमधील कॉलेजांमध्येही अकरावीचे प्रवेश यापुढे ऑफलाइनऐवजी ऑनलाइन होणार आहेत.

हे विद्यार्थी लगतच्या केवळ एका प्रवेश फेरीतूनच बाद
– पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळूनही नाकारणारे
– घेतलेला प्रवेश रद्द करणारे
– ज्युनियर कॉलेजने प्रवेश
नाकारलेले