
सततच्या बदलत्या हवामानाचा मासेमारीला चांगलाच फटका बसला आहे. एरव्ही गजबजलेल्या हर्णे बंदरात मासळीचा तुटवडा जाणवत असल्याने खास भटकंतीसाठी आलेल्या पर्यटक खव्ययांचे मात्र मासळी विना चांगलेच हाल होत आहेत.
मे महिन्यातील उकाड्याने त्रस्त झालेले पर्यटक कामातील शीण घालवण्यासाठी मिनी महाबळेश्वर ओळख असलेल्या दापोलीत पर्यटनासाठी येत आहेत. दापोलीला निसर्गतःच लाभलेली स्वच्छ सुंदर समुद्र किनारपट्टी ही पर्यटकांना भावते. त्यामुळे जोडून शासकिय सुट्टया आल्या अथवा शनिवार रविवारी पर्यटक पूर्वी दापोलीत येत होते. आता मात्र तसे राहीलेले नाही. मनात आले की पर्यटक हे दापोलीतील किनाऱ्यावर येत असतात. तसे गेल्या चार दिवसांपासून दापोलीतील सर्वच बिचवर पर्यटक मोठया संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे कोकणच्या रान मेव्याला चांगलाच दर मिळत आहे.
कोकणचा रानमेवा विककाणाऱ्या स्थानिकांना व्यवसाय होत असल्याने सुगीचे दिवस आले आहेत. त्यात कोकणचा राजा अर्थात हापूस आंबा खरेदी करण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडत आहे. आधीच अवकाळी पावसाने दापोलीला झोडपल्याने आंबा फळ पिक धोक्यात आले आहे. त्यात काही बागायतदारांकडे असलेल्या किरकोळ प्रमाणातील हापूसला आंब्याला मात्र चांगलाच बाजारभाव मिळत आहे.
दापोलीत येणारा पर्यटक हा मासळी खाण्यासाठी खासकरून बिचवर येत असतो. मात्र बदलत्या हवामानाचा फटका हा मासळी व्यवसायाला बसला असून हर्णे बंदरात जाणवणाऱ्या मासळीच्या तुटवडयाने पर्यटक खव्ययांचे चांगलेच हाल झाले आहेत. कधी पर्ससीन नेटव्दारे होणारी मासेमारी, कधी एलईडी लाईटव्दारे करण्यात येणारी छूपी मासेमारी, कधी समुद्रातील बदलाने मासेमारीवर येणारी संक्रात तर कधी फास्टर मलपी बोटींचा त्रास. यामुळे आधीच त्रस्त असलेल्या येथील पारंपारिक मासेमारांना सध्या बिचवर मोठयासंख्येने उतरत असलेल्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे मासळीचा उठाव होवू लागला. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारी बोटींना बदलत्या हवामानामुळे मासळीच मिळेनाशी झाल्याने मासेमारांवर मोठीच आपत्ती आली आहे.
मासेमारी बंदीचा काळ जवळ आल्याने मासेमारीच्या अखेरच्या दिवशी तरी मासेमारी व्यवसाय होईल या विचारात असलेल्या मासेमारांची निसर्गाच्या अवकृपेमुळे पार निराशा झाली आहे.





























































